Wine in Maharashtra: किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार
मुंबई | Wine in Maharashtra : आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्याात आला आहे. आता दुकानात (Wine in Store) आणि सुपरमार्केटमध्येही वाईन मिळणार असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी मात्र महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. महाराष्ट्राचा मध्यराष्ट्र बनवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर भरकटलेल्या सरकारचा भरकटलेला निर्णय आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. शेतकऱ्यांची नाही तर दारूड्यांची काळजी करणार हे सरकार आहे, अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे. तसेच उद्याची पिढी बर्बाद कशी होईल याच्याशी ह्या सरकारला काही देणघेण नाही, बेवड्यांना समर्पित असा हा सरकारचा निर्णय आहे, असे दरेकर म्हणाले आहेत. ना मंदीरांची काळजी, ना शिक्षण आणि शिक्षकांची काळजी, पण दारू विक्रेत्यांची ह्या सरकारला काळजी आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित असल्याची घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. तर ठाकरे सरकारला शेतकऱ्यांची नाही तर बेवड्यांची काळजी असल्याचा घणाघात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय.
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. ‘मस्त पियो, खुब जियो हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे. कोरोनात सर्वसामान्यांना औषधांची गरज आहे. पण आम्ही दवा नही दाऊ देंगे, असं हे सरकार आहे. कष्टकऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी या सरकारला वेळ नाही. राजकारण करणे आणि दारुवाल्यांना प्रोत्साहन देणे. चंद्रपूरची दारुबंदी हटवली. वाईन प्रोत्साहन योजनेत 4 वर्षे आम्ही पैसे दिले नव्हते. ते पैसे यांनी कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक तणावातही दिले. यांनी दारुवर जो 300 टक्के कर होता तर दीडशे टक्क्यांवर आणला. वीज स्वस्त असण्याचं कारण नाही, घरात वीज अंधार असला तरी चालेल. यातून शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही, उलट वाईन उद्योजकांनाच त्याचा फायदा होणार आहे. वाईन उद्योजक जे आहेत मी नाव घेणार नाही पण एका कंपनीचे बटिक आहेत. त्या कंपनीचं मी नाव घेणार नाही, पण त्या कंपनीची पोहोच एवढी आहे मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती कंपनी स्वत:ला साजेसे निर्णय घेऊ शकते’, असा गौप्यस्फोट मुनगंटीवार यांनी केला आहे.
Web Title: Wine in Maharashtra Decision