दुचाकीला वाचविताना जीप थेट विहिरीत, ७ वारकऱ्यांचा मृत्यू
Breaking News | Jalana Accident: विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळल्याने सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू. मृतांत ४ पुरुष, ३ महिला.
जालना: विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळल्याने सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुदैवाने तिघांचे प्राण बचावले. जालना-राजूर मार्गावरील वसंतनगर शिवारात गुरुवारी सायंकाळी समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात जीप चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे गाव अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असतानाच वारकऱ्यांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
चनेगाव व तपोवन येथील भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन ते बसने गुरुवारी दुपारी जालना शहरात आले. त्यानंतर एका जीपमध्ये बसून ते गावाकडे निघाले होते. जालना-राजूर मार्गावर वसंतनगर शिवारात समोरून आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. दरवाजाची काच फुटल्याने जीपचालक बाहेर आला.
अशी आहेत मृत व जखमींची नावे : प्रल्हाद उत्तम महाजन (६०), मंदा बाळू तायडे (३५), प्रल्हाद आनंदा बटले (७५), नारायण किसन निहाळ (४५), चंद्रकला अंबादास घुगे (सर्व रा. चनेगाव ता. बदनापूर), रंजना कैलास कांबळे (४५ रा. शास्त्री मोहल्ला, जुना जालना), ताराबाई भगवान मालुसरे (रा. तपोवन ता. भोकरदन) अशी मृतांची नावे आहेत. तर ताराबाई गुळमकर, सखुबाई महाजन, आरती तायडे, अशोक पुंगळे अशी जखमींची नावे आहेत.
त्याचवेळी शेतशिवारात काम करणारे नागरिक मदतीला धावून आले. परंतु, मदत मिळेपर्यंत सात जणांचा बुडून मृत्यू झाला. तिघांना वाचविण्यात यश आले. जखमींवर राजूर रूग्णालयात उपचार करण्यात आले.
Web Title: While rescuing a two-wheeler, the jeep fell directly into the well, 7 people died
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study