संगमनेर: नांदूर खंदरमाळ येथील ग्रामस्थांना गाव पेटवून देण्याची धमकी
Breaking News | Sangamner: हातात लाठ्या-काठ्या, तलवार, गावठी कट्टा घेऊन दहशत माजविण्यार्या सहा जणांविरुद्ध घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल.
संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळ येथील ग्रामस्थांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार रविवारी (दि.14 जुलै) रात्री 9.30 वाजेच्या सुमारास गवळी बाबा देवस्थान येथे घडला. हातात लाठ्या-काठ्या, तलवार, गावठी कट्टा घेऊन दहशत माजविण्यार्या सहा जणांविरुद्ध घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. रवी डावखर, तेजस रेपाळे, विशाल गोंधे, प्रदीप आवारी, ओमकार वाकचौरे, अभिजीत गोंधे अशी गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सुरेश सारंगधर भागवत (रा. नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर) या शेतकर्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.
रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी सुरेश भागवत यांचे नातेवाईक असलेले ऋषिकेश करंजेकर यांच्या मोबाईलवर तेजस रेपाळे याने फोन केला. करंजेकर यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांचे घर जाळण्याची व गाव पेटवून देण्याची धमकी दिली. तसेच तू वाहनचालक असून तू आळेफाट्याला आल्यास तुझी गाडी पेटवून देत ठार मारू, अशी धमकीही दिली. तसेच भागवत यांचे नातेवाईक वैभव करंजेकर यांच्या मोबाईलवर फोन करून रवी डावखर (रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) याने धमकी दिली. आम्ही 30 ते 35 जण गँगवॉरमधील असून तुझ्या घराकडे येतो आहे. तुझ्या घराचा पत्ता सांग, तू पत्ता सांगितला नाहीतर तुमचे संपूर्ण गाव पेटवून देऊ, अशीही धमकी देण्यात आली.
दरम्यान, विकास करंजेकर, बाळकृष्ण भागवत हे गावातील गवळी बाबा देवस्थान येथे नैवेद्य ठेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे 25 ते 30 जण हातात लाठ्या-काठ्या व तलवार घेऊन उभे होते. रवी डावखर याच्या हातात तलवार होती. तेजस रेपाळे याच्या हातात गावठी कट्टा होता. विशाल गोंधे याच्याकडे हॉकीस्टीक, प्रदीप आवारी याच्या हातात लोखंडी गज, ओमकार वाकचौरे याच्याकडे तलवार होती. अभिजीत गोंधे याच्याकडे लाकडी दांडा होता. त्यांनी दोघांना संपवून टाकू, अशी धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करीत आहेत.
Web Title: Villagers of Nandur Khandarmal threatened to set the village on fire
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study