अकोले: शरद पवार गटातील प्रवेशाच्या चर्चांविषयी वैभव पिचड यांचं स्पष्ट उत्तर
Breaking News | Akole BJP: आम्ही भाजपमध्ये रमलो असल्याचे वैभव पिचड यांनी सांगितले.
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य, माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्या भाजपवासी असलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड हे स्वगृही परतणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शरद पवार हे शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करणार असून अकोले येथे त्यांच्या पक्षाचा मेळावा आयोजित करणार आहे. या कार्यक्रमाला पिचड पितापुत्र हजेरी लावणार असल्याची चर्चा आज सकाळपासून सुरु आहे. मात्र, वैभव पिचड यांनी या सर्व चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट केले.
अनेक वर्षे आम्ही जुन्या पक्षात काम करताना शरद पवार यांच्यासोबत काम केलं होतं. त्या पक्षात काम करताना पिचड साहेबांनी प्रामाणिकपणे प्रदेशाध्यक्षपद धुरा सांभाळली. पक्ष एक नंबरला आणण्यासाठी ते दिवसरात्र राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरले. त्यानंतर आम्ही तो पक्ष सोडला आणि भाजपमध्ये आलो. भाजपमध्ये आल्यानंतर पूर्ण तालुक्यात कानाकोपऱ्यात भाजपचं कमळ पोहोचवण्याचे काम आम्ही केले. हे काम करताना आम्ही भाजपमध्ये रमलो असल्याचे वैभव पिचड यांनी सांगितले.
आम्ही भाजपमध्ये रमलो असताना या सगळ्या चर्चा येतात कुठून? आज शरद पवार साहेबांचा दौरा सुरु आहे. या दौऱ्यावेळी आणि सभेला गर्दी झाली पाहिजे यासाठी पिचड साहेब याठिकाणी येणार, अशी अफवा स्थानिक पुढाऱ्यांकडून पसरवली जात आहे. पिचड साहेब पवारांना भेटणार आणि राष्ट्रवादीत प्रवेश करणार, असे सांगितले जात आहे. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे वैभव पिचड यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी पिचड कुटुंबीय भाजप मध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Web Title: Vaibhav Pichad’s clear answer on Sharad Pawar’s entry talks
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study