महाविकास आघाडीच्या या जागा धोक्यात, हे आहे कारण !
Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा मतदारसंघ कसबा, पर्वती, कोथरूड, हडपसर तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी.
पुणे : पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारी न दिल्याने काँग्रेसच्या तीन पदाधिकाऱ्यांनी विधानसभेसाठी वेगवेगळ्या मतदारसंघांतून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या या बंडखोरीचा फटका काँग्रेससह महाविकास आघाडीला बसणार आहे. या बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत काँग्रेसने दिले असले, तरी निवडणूक लढविण्याचा निर्धार या सर्वच बंडखोर उमेदवारांनी केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला जोरदार फटका बसला. याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये यासाठी गेल्या काही महिन्यांपासून महायुतीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. बंडखोरांची भेट घेऊन, त्यांची समजूत काढून, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महायुतीचे नेते पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील होते. त्यामुळे पुणे शहरातील महायुतीकडून बंडखोरी होण्याची भीती असलेल्या कसबा, पर्वती, कोथरूड, हडपसर तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी शमली.
दुसरीकडे, काँग्रेस नेते मात्र गाफील राहिल्याचे दिसते. काँग्रेसला मानणारा हक्काचा मतदार असलेल्या कसबा, शिवाजीनगर यांसह महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या वाट्याला आलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त काँग्रेसच नाही, तर महाविकास आघाडीदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कसबा मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी कसब्यातून, तर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे मनीष आनंद यांनी शिवाजीनगरमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने पर्वती विधानसभेसाठी अश्विनी कदम यांना उमेदवारी दिलेली असतानाही काँग्रेसचे माजी उपमहापौर आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी बंडखोरी केली आहे.
या सर्व प्रकारामुळे महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारात उतरावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला आहे. मात्र, यानंतरही बंडखोरी केलेले पदाधिकारी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहायला मिळते. या बंडखोरांची मनधरणी करून त्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय करण्याचे मोठे आव्हान काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. अन्यथा, निवडणुकीमध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा विरोधी पक्षाला मिळू शकतो.
Web Title: This is the reason why Mahavikas Aghadi is in jeopardy Assembly Elections
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study