अहमदनगर: चक्क पोलीस कार्यालयातच घुसले चोर
Ahmednagar Thieves: कार्यालयातील जुन्या अभिलेखांची कागदपत्रे चोरण्याचा प्रयत्न, महिला पोलिसाच्या तत्परतेमुळे चोरट्यांचा डाव फसला. घरफोडीचा गुन्हा दाखल.
अहमदनगर: पोलिस अधीक्षक कार्यालयातील गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील जुन्या अभिलेखांची कागदपत्रे चोरण्याचा प्रयत्न झाला. कागदपत्रांच्या १० ते १२ गोण्या चोरण्याचा हा प्रयत्न महिला पोलिसाच्या तत्परतेमुळे फसला.
शहरातील सर्जेपुरा भागात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पोलिस मुख्यालयात निवासस्थाने आणि महत्त्वाच्या विभागांची कार्यालये आहेत. या इमारतीची दुरवस्था झाल्याने अनेक कर्मचारी इथे राहत नाहीत. पोलिस अधीक्षक कार्यालयातील गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक विभागातील जुनी कागदपत्रे आणि अभिलेख पोलिस मुख्यालयातील ब्लॉक क्रमांक ३२ मधील खोली क्रमांक ४१८ मध्ये ठेवण्यात आली होती.
एक मालवाहू रिक्षाचालक गुरुवारी दुपारी दीड वाजता या ठिकाणी विना क्रमांकाचा टेम्पो घेऊन आला. त्याने टेम्पोमध्ये या खोलीतील १० ते १२ गोण्या जुनी कागदपत्रे टाकली. ही बाब महिला पोलिस अंजली बर्डे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ती तत्काळ तोफखाना पोलिसांना कळविली. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, तोफखाना पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, गुन्हे शोध शाखेचे पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंखे तत्काळ घटनास्थळी आले. टेम्पोचा शोध घेऊन पकडला. सध्या तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात टेम्पो आणण्यात आला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक राजू निवृत्ती धीवर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिस नाईक संपदा तांबे अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Thieves broke into the police office itself
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App