संगमनेर तालुक्यात वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला
संगमनेर | Sand Theft: संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी शिवारात कच नदीपात्रातून अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डम्पर महसूलच्या पथकाने सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास चार ते पाच किलोमीटर अंतरावर पाठलाग करून पकडले. डंपर घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेळकेवाडी परिसरातील कच नदी पात्रातून भोरमळा येथून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती संगमनेर महसूल विभागाचे नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना मिळाली.
त्यानुसार रविवारी तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार कडनोर यांच्यासह तलाठी दादा शेख, कोतवाल शशिकांत खोंडे, मिथुन खोंडे यानी कच नदीपात्राकडे धाव घेतली. यावेळी पथकाला डंपर क्रमांक एम.एच. ०५ डी.के ०५०८ वाळूची अवैध वाहतूक करताना मिळून आला. पथक आल्याची चाहूल लागताच डंपर चालकाने डंपरमधील वाळू नदीपात्रात रिकामी करून पळ काढला. मात्र नायब तहसीलदार व त्यांच्या सहकार्यांनी नदीपात्रात चार ते पाच किलोमीटर अंतर पायी जात पाठलाग करीत डंपर ताब्यात घेतला. यावेळी चालक फरार झाला असून प्रथमेश राजेंद्र डुंबरे रा. ओतूर यांच्या मालकीचा हा डंपर आहे. त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आहे. डंपर घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
Web Title: Theft dumper transporting sand was caught in Sangamner taluka