संगमनेर बसस्थानकात आणखी एक चोरीची घटना, ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरीला
Sangamner Theft: महिलेकडील सोने-चांदीच्या दागिन्यांचा डबा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना संगमनेर बस स्थानकात. या चोरीत तब्बल ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरीला.
संगमनेर: राहुरी येथे जाण्यासाठी निघालेल्या महिलेकडील सोने-चांदीच्या दागिन्यांचा डबा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना संगमनेर बस स्थानकात सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. संगमनेर बस स्थानकात चोरीचे सत्र सुरूच आहे. सातत्याने होणाऱ्या चोर्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. या चोरीत तब्बल ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रजनी सूर्यभान सहाणे (वय ६३, रा. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सहाणे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहे. त्यांचा मुलगा तिरुपती, आंध्र प्रदेश येथे राहत असल्याने त्यांना मुलाकडे राहायला जायचे होते. त्या संगमनेर बस स्थानकात आल्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी अर्चना ज्ञानेश्वर कर्पे या होत्या. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्या दोघी राहुरी येथे जाण्यासाठी नाशिक-सोलापूर बसमध्ये बसल्या. बसमध्ये बरीच गर्दी होती. ही बस ज्ञानमाता शाळेजवळ गेल्यानंतर तिकीट काढण्यासाठी त्या पर्समधून पैसे काढत असताना त्यांना दागिन्यांचा डबा दिसला नाही.
त्यांनी त्यांच्याकडील सर्व बॅगा शोधल्या, परंतु दागिन्यांचा डबा मिळून आला नाही. तीन तोळे वजनाचा राणीहार, चार तोळे वजनाचे गंठण, दोन तोळे वजनाची सोन्याची चेन, दीड तोळे वजनाच्या अंगठ्या, दोन चांदीच्या अंगठ्या असा एकूण ३ लाख १५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
Web Title: theft at Sangamner bus stand, gold and silver jewelery worth Rs 3 lakh 15 thousand stolen
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App