प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत 16 जणांची नावं
Nashik suicide : प्रेमसंबंधांच्या विरोधात वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना. सोळा जणांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा.
नाशिक: प्रेमसंबंधांच्या विरोधात वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सोळा जणांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी गोविद नवनाथ मिटके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण उज्ज्वला रामकृष्ण खताळ (रा. वंजारवाडी, ता. नांदगाव) हिचे तिच्या गावातील ज्ञानेश्वर माधव पवार याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गावातील काही लोकांनी त्यांच्या नात्याला विरोध करत त्यांना वारंवार ‘आत्महत्या करा’ अन्यथा ठार मारू अशी धमकी दिल्याने त्या मानसिक छळाला कंटाळून दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
उज्ज्वलाने तिच्या भावाला दि. 11 मार्च 2025 रोजी रात्री 8.50 वाजता व्हॉट्सॲपवर एक चिठ्ठी पाठवली. त्यात तिने आत्महत्येस जबाबदार असलेल्या 16 जणांची नावे नमूद केली होती. त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, या व्यक्तींनी तिला आणि तिच्या प्रियकराला धमकावत, त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती समजताच फिर्यादी गोविद मिटके आणि त्यांचे नातेवाईक मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले. मात्र, तिथे त्यांना माहिती मिळाली की, उज्ज्वला आणि ज्ञानेश्वर या दोघांनी नस्तनपूर शनिदेव मंदिराजवळ रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता, दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय, नांदगाव येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आल्याचे समजले.
या प्रकरणी उज्ज्वला व ज्ञानेश्वर यांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या 16 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींवर देखील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे. अरुण / मधुकर रामा गायकवाड, संदिप वाल्मिक सावंत, प्रकाश वाल्मिक सावंत, नवनाथ मारुती जाधव, संतोष माधव पवार, अनिल राधु दखने, संजय मारुती सोनवणे, रोहिदास मारुती सोनवणे, सोपान सुर्यभान गुंडगळ, सुनिता ज्ञानेश्वर पवार, सोनल संतोष पवार, जन्याबाई छबु गुंडगळ, नितीन सुभाष घाडगे (रा. मनमाड), सतिष/बाल्या दत्तू जाधव, बाळु सटवा गोसावी, छगन दादा साठे या सोळा जणांविरुद्ध नांदगाव पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
Web Title: Suicide Woman jumps under train with boyfriend 16 names on note