अवैध सावकारीतून व्यापाऱ्याची आत्महत्या, माजी नगरसेविकेच्या मुलासह तिघांवर गुन्हा
Breaking News | Nanded Crime: व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावला जात असल्याने एका व्यापाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
नांदेड : व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावला जात असल्याने एका व्यापाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी तिघांविरोधात महाराष्ट्र सावकारी अॅक्ट आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी मात्र फरार असल्याची माहिती आहे.
व्याजाचे पैसे थकवाल्याने आरोपी हे समीर येवतीकर यांच्याकडून दररोज एक हजार रुपये दंड घेत होते. याच त्रासाला कंटाळून येवतीकर यांनी आपले जीवन संपवले होते. मुख्य आरोपी दिपक पाटील हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक मानले जातात.
समीर येवतीकर यांचा आवळा कँडी विक्रीचा व्यवसाय होता. बुधवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी येवतीकर यांनी चिठ्ठी लिहली होती, त्या चिठ्ठीमध्ये दिपक पाटील हा पैशांसाठी तगादा लावत होता, त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.
समीर येवतीकर यांनी तीन वर्षांपूर्वी आरोपी दिपक पाटील यांच्याकडून दोन वेळेस एक एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. व्याजाचे पैसे थकल्याने समीर यांना आरोपीकडून धमकी दिली जात होती. पैशांसाठी आरोपींनी १९ एप्रिल रोजी राहत्या घरातून जबरदस्ती नेले होते. पैसे न दिल्याने महिलेच्या माध्यमातून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली होती. याच धमकीला आणि त्रासाला कंटाळून समीर येवतीकर यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
समीर यांना सात वर्षांचा एक मुलगा आहे. आई-वडील वृद्ध आहेत. त्यांना देखील समीर हा एकुलता एक मुलगा होता. अवैध सावकारीमुळे हसतं खेळतं घर उध्वस्त झालं आहे. याप्रकरणी मयताचे वडील सुधाकर येवतीकर यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिसांनी आरोपी दिपक पाटील, संदीप ढगे आणि दयानंद विभुते यांच्याविरोधात कलम ३०६, ३८५, ५०४, ५०६, ३४ आणि महाराष्ट्र सावकारी अॅक्ट ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान या घटनेत राजकीय पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.
या आत्महत्या प्रकरणात दिपक पाटील यांचं नाव आलं आणि एकच खळबळ उडाली. दिपक पाटील हे माजी नगरसेविकेचे पूत्र आहेत. शिवाय माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक आहेत. आता पुढे काय काय कारवाई होणार याकडे पाहणे उचित होईल.
Web Title: Suicide of businessman from illegal moneylender, crime against three including son
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study