अहमदनगर: कोपर्डीतील आत्महत्या; तिघांना अटक
Breaking News | Ahmednagar: यात्रेनिमित्ताच्या तमाशामध्ये झाला होता वाद, घरात गळफास घेऊन आत्महत्या.
कर्जत: कोपर्डी (ता. कर्जत) येथील नितीन ऊर्फ विठ्ठल कांतीलाल शिंदे याच्या आत्महत्येप्रकरणी तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. यातील दोघांना तत्काळ अटक केली होती, तर तिसऱ्या आरोपीला शुक्रवारी (दि.३) सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. यातील दोघांना कर्जत न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दिनेश ऊर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रिक, वैभव मधुकर सुद्रिक अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. यातील दिनेश ऊर्फ बंटी सुद्रिक आणि वैभव सुद्रिक यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
बुधवारी (दि.१) कोपर्डी गावात भैरवनाथाची यात्रा होती. यात्रेनिमित्त आयोजित तमाशात भांडणे झाली होती. दिनेश ऊर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रिक, वैभव मधुकर सुद्रिक या तिघांनी नितीन ऊर्फ विठ्ठल शिंदे याला नाचण्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच तो घरी येत असताना वरील तिघांनी पुन्हा त्यास मारहाण करत स्मशानभूमीत नेऊन नग्न केले. त्याच्याकडील कपडे, मोबाइल सगळे काढून घेतले. त्यामुळे विठ्ठलला घरी येता आले नाही.
याच अपमानामुळे आपली जगण्याची इच्छा नाही, असे म्हणत गुरुवारी (दि.२) दुपारी विठ्ठलने त्याचे चुलते बाबूलाल गोपाळ शिंदे यांच्या घरात गळफास घेतला. गळफास घेण्यापूर्वी त्याच्या खिशात ‘माझे जीवन संपवत असून या बाबीला बंटी बाबासाहेब सुद्रिक व स्वप्निल बबन सुद्रिक कारणीभूत आहेत’, असे त्याने चिठ्ठीत नमूद केले, असे फिर्यादीत त्याचे वडील कांतीलाल शिंदे यांनी म्हटले आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी मयत तरुणाच्या नातेवाईकांनी शुक्रवारी कर्जत पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.
Web Title: Suicide in Kopardi Three arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study