अहिल्यानगर: अनैसर्गिक अत्याचार करणारे सहा जणांना अटक
Breaking News | Ahilyanagar Crime: अनैसर्गिक अत्याचार करणारे सहाजण अटकेत, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अहिल्यानगर: मित्राच्या घरातून विद्यार्थ्याला उचलून नेऊन त्याच्यावर केडगाव नेप्ती मार्केटजवळ अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी सहाजणांना अटक केली. त्यांना शनिवारी (दि.19) जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, अन्य पाच आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
रावण साम्राज्य ग्रुपचा अध्यक्ष मयूर अनिल आगे, शाहरुख अन्सार पठाण, ओमकार उर्फ भैया राहिंज, रोहित पंडागळे, सोनू बारहाते, ऋषिकेश सातपुते (सर्व रा. केडगाव) अशी आरोपींची नावे आहेत. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीनंतर पीडित विद्यार्थी हा नेप्ती रोडवरील त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. त्यानंतर रात्री तिथे वरील आरोपी व त्यांचे 6 साथीदार मोटारकार व दुचाकीवर आले. त्यांनी त्याला घरातच मारहाण केली. सोडविण्यासाठी आलेल्या मित्राला व त्याच्या वडिलांनाही मारहाण केली. पीडिताला घराबाहेर ओढत नेऊन नेप्ती मार्केटयार्ड जवळील मोकळ्या मैदानात नेले.
तिथे मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तीन दिवसांनंतर कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल होताच सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी तत्काळ गुन्ह्यातील मुख्य आरोपी मयुर आगे याच्यासह सहाजणांना अटक केली. शनिवारी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले. गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध घेऊन अटक करावयाची आहे. आरोपींनी गुन्हा नेमका कोणत्या हेतूने केला याबाबत विचारपूस करायची आहे. गुन्ह्यातील स्कार्पिओ, गळा आवलेला पंचा जप्त करावयाचा आहे. त्यासाठी आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी तपासी अधिकारी कुणाल सपकाळे यांनी केली.
त्यावर न्यायालयाने आरोपींना 23 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली.दरम्यान, पीडित विद्यार्थ्याबरोबर मारहाण झालेल्या अन्य एका अल्पवयीन मुलाचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. तर, ज्या मित्रांच्या घरातून उचलून नेले. त्याचा आणि त्याच्या वडिलांचाही जबाब पोलिसांनी घेतला आहे.
Breaking News: Six people arrested for unnatural abused