टेम्पोने उसाच्या दोन बैलगाड्यांना धडक दिल्याने चार मजूर व तीन बैल जखमी
श्रीगोंदा | Shrigonda: नगर दौंड रोडवर ढोकराई फाट्याजवळ वेगाने जाणाऱ्या टेम्पोने उसाच्या दोन बैलगाड्यांना जोराची धडक दिल्याने चार उस तोडणी मजूर व तीन बैल गंभीर झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागवडे साखर कारखान्यावर बैलगाडी उस भरण्यासाठी काष्टी येथे पहाटे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने (क्रमांक एम.एच.१२. एफ. झेड.५७३६) बैलगाड्यांना जोराची धडक दिली. यामध्ये रामदास गोरख महाजन, मनीषा रामदास महाजन, बाबासाहेब नागरगोजे रा. खिळद ता. आष्टी जि. बीड व त्यांचे ३ बैल गंभीर जखमी झाले आहेत. दौंड येथील रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात बैलगाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भास्कर जगन्नाथ ठाकरे रा. साक्री, जि. धुळे या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Shrigonda the tempo hit two sugarcane bullock carts