शिवसेनेत कोणाला फायदा, कोणाला फटका
अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील खाते बदलात शिवसेनेच्या शिंदे गटातील काही मंत्र्यांना फायदा, तर काही मंत्र्यांना फटका.
मुंबई : अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील खाते बदलात शिवसेनेच्या शिंदे गटातील काही मंत्र्यांना फायदा, तर काही मंत्र्यांना फटका बसला आहे. शिंदे गटातील वादग्रस्त मंत्र्यांकडील महत्त्वाची खाती काढून घेण्यात आली असून त्याऐवजी दुय्यम खाती देण्यात आली आहेत.
संजय राठोडांकडून अन्न औषध प्रशासन गेले
संजय राठोड यांच्याकडून अन्न व औषध प्रशासन खाते काढून घेण्यात आले असून त्यांना मृद व जलसंधारण खाते देण्यात आले आहे. राठोड मंत्रिपदाच्या कार्यकाळात प्रचंड वादग्रस्त ठरले होते. त्यांच्याविरोधात केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली होती. औषध दुकानदारांना त्रास देऊन सुनावणीत गैरप्रकार केले जात असल्याची तक्रार राठोड यांच्याविरोधात करण्यात आली होती.
अब्दुल सत्तारांकडे आता अल्पसंख्याक व पणन
शिंदे गटातील दुसरे वादग्रस्त मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे अल्पसंख्याक आणि पणन खाती देण्यात आली आहेत. मतदारसंघात घेतलेल्या कृषी महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना पैसे जमा करण्याचे टार्गेट सत्तार यांनी दिल्याची चर्चा होती. त्याचबरोबर ते कृषी खाते योग्य पद्धतीने चालवत नसल्याच्याही तक्रारी होत्या. काही वादग्रस्त वक्तव्यांमुळेही ते चर्चेत होते.
भुसेंकडे एमएसआरडीसीचा कार्यभार
दुसरीकडे शिंदे गट सरकारमध्ये सहभागी झाला तेव्हा बंदरे व खनिकर्म ही दुय्यम खाती मिळालेल्या दादा भुसे यांना खातेबदलात एमएसआरडीसीचा कार्यभार देण्यात आलेला आहे. २०१४ पासून हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. राज्यात अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचे काम या खात्यामार्फत सुरु आहे.
Web Title: Shiv Sena, who benefits, who suffers
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App