धक्कादायक शिर्डीत गोळीबार: तरुणावर झाडल्या गोळ्या
शिर्डी | Shirdi Firing: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात गोळीबाराची घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या घडली होती. यावेळी एका तरुणाने बांधकाम व्यवसायिकाची भर रस्त्यावर गोळ्या घालून हत्या (Murder) केली होती. ही घटना ताजी असताना महाराष्ट्राला हादरवणारी गोळीबाराची आणखी एक घटना शिर्डीत समोर आली आहे.
शिर्डीतील लक्ष्मीनगर भागात एका खाजगी पार्किंगमध्ये एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. या घटनेत शिर्डी शहरातील तरुण सूरज ठाकूर हा गंभीर जखमी झाला आहे. भल्या पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या आवाजामुळे अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, संबंधित तरुण घटनास्थळी गंभीर अवस्थेत आढळून आला.
स्थानिकांनी सूरजला तातडीने शिर्डीतील साईबाबा सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. भल्या पहाटे गोळीबार घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून जखमी सूरज याच्यावर उपचार केले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Web Title: Shirdi Firing young Man