शिर्डी: बस दुभाजकावर धडकल्याने बसमध्ये असलेले दोघे बाहेर फेकले अन…
Shirdi Accident: नगर-मनमाड महामार्गावर एक बस दुभाजकावर धडकल्याने दुभाजकावरील हायमॅक्स लाईटचा पोल खाली कोसळला.
शिर्डी: शिर्डी शहरातील साईबाबा संस्थानच्या साई आश्रम एकसमोर नगर-मनमाड महामार्गावर एक बस दुभाजकावर धडकल्याने दुभाजकावरील हायमॅक्स लाईटचा पोल खाली कोसळला. यात बसमधील दोघेजण गंभीर जखमी झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की रविवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी साईबाबा संस्थानच्या एक हजार रुम या भक्त निवासासमोर एक खाजगी प्रवासी बस श्रीरामपूरच्या दिशेने वेगाने जात असताना दुभाजकाला जाऊन धडकल्याने बसमध्ये असलेले दोघे बाहेर फेकले गेले. तर दुभाजकावर असलेल्या हायमॅक्स लाईटचा पोल रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली कोसळला. बसचा क्रमांक एमएच ०३ सीव्ही १८१८ असून बस मुंबईवरून शिर्डी व श्रीरामपूर येथे जात असताना हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात आले. धडक इतकर भीषण होती की बसमध्ये पुढे कॅबीनमध्ये बसलेल्यांपैकी एक जण बसच्या पुढच्या काचेतून बाहेर फेकला गेला. हा तरुण श्रीरामपूर येथील रहिवासी असून त्याचे नाव कल्पेश शाम कुऱ्हे (वय २६ वर्षे) आहे. त्याच्या मानेला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर दुसरा रितेश प्रकाश पाटणी ( राहणार श्रीरामपूर) हाही या अपघातात जखमी झाला आहे. साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.
साईआश्रम एकसमोर खासगी वाहने तसेच फुटपाथवर विक्रेत्यांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असल्याने साईभक्तांना मार्गक्रमण करताना नाकीनऊ येत आहेत. अपघातासमयी गर्दी नसल्याने जीवितहानी टळली. दि. १७ ऑगस्ट रोजी साईआश्रम एक येथे साई चरीत्र पारायण सोहळा सुरू होत आहे. त्या अनुषंगाने पारायणार्थीना संस्थानने गेटसमोरून आतमध्ये जाण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे अशी मागणी पुढे आली आहे.
Web Title: Shirdi Accident bus hit the divider, the two occupants of the bus were thrown out
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App