अहिल्यानगर: ‘तिला’ बिबट्याने नव्हे तर प्रियकराने पळविले
Breaking News | Ahilyanagar: एका विवाहित तरुणीला बिबट्याने ओढून नेल्याची अफवा पसरली. प्रियकर-प्रेयसीच्या नाटकाचा अखेर पर्दाफाश.
राहुरी : बारागाव नांदूर परिसरात एका विवाहित तरुणीला बिबट्याने ओढून नेल्याची अफवा पसरली आणि वन विभागापासून ते प्रशासनापर्यंत सगळ्यांची धावपळ सुरू झाली. पण त्या तरुणीच्या आजूबाजूला सापडलेल्या वस्तूंवरून संशय निर्माण झाला.
अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि सत्य समोर आले. बिबट्याचा काहीही संबंध नसून, त्या तरुणीला तिच्या प्रियकराने पळवले होते. पोलिसांनी दोघांना नेवासा हद्दीतून ताब्यात घेतले आणि या नाट्यमय घटनेचा पडदा उघडला.
राहुरी परिसरात ही तरुणी बिबट्याच्या हल्ल्यात बेपत्ता झाल्याची चर्चा जोरात सुरू झाली होती. वन विभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांनी तातडीने तीन पथके जमवली आणि रात्रभर सुमारे दोनशे एकर परिसर पिंजून काढला.
गावातले ३०० ते ४०० तरुणही दोन दिवस शोधमोहिमेत उतरले. पण या दरम्यान, त्या तरुणीचे गळ्यातले गंठण, गवत कापायला नेलेले कापड, विळा, शर्ट, मोबाइलची बॅटरी आणि कव्हर वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. हे पाहून वन विभागाला खात्री झाली की हा हिंस्र प्राण्याचा हल्ला नाही.
मग पोलिसांसमोर या गूढाचा उलगडा करण्याचे आव्हान आले. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात झाली. पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके, पोलिस नाईक गणेश सानप, पोहेकॉन्स्टेबल विकास वैराळ, सागर नवले, अंबादास गिते यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सायबर पोलिस सचिन धनाड यांनीही महत्त्वाची मदत केली. तपासातून एक धक्कादायक बाब समोर आली. बिबट्याने नाही, तर त्या तरुणीच्या प्रियकराने तिला पळवले होते. पोलिसांनी दोघांचा ठावठिकाणा शोधून काढला.
नेवासा हद्दीतील प्रवरा संगम परिसरात ते लपले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धडक दिली आणि दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सांगितले की, सर्वांचे लक्ष वळवण्यासाठी आणि बिबट्याने ओढून नेल्याचा बनाव रचण्यासाठी त्यांनी गंठण, साडीचा तुकडा आणि इतर वस्तू जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या होत्या.
राहुरी पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना बोलावून घेतले आणि सविस्तर माहिती दिली. हे प्रकरण उघड झाल्यावर पोलिस आणि वन विभागानेही सुटकेचा नि:श्वास टाकला. बिबट्याची बदनामी करणाऱ्या या प्रियकर-प्रेयसीच्या नाटकाचा अखेर पर्दाफाश झाला.
Web Title: She’ was kidnapped by her lover, not a leopard