अहिल्यानगर: लग्नात करवली म्हणून आली, 64 तोळ्यांचे दागिने घेऊन गेली
Ahilyanagar Crime: युवतीने लग्न घरातून तब्बल 64 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे दागिने व 27 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 51 लाख 86 हजारांचा ऐवज चोरून नेला.
अहिल्यानगर : नवरीसोबत करवली म्हणून आलेल्या युवतीने लग्न घरातून तब्बल 64 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे दागिने व 27 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 51 लाख 86 हजारांचा ऐवज चोरून नेला होता. दरम्यान, तोफखाना पोलिसांनी केवळ 24 तासांत चोरीप्रकरणाचा छडा लावत 57 तोळे 9 ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा 44 लाख 2 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दागिने चोरणार्या युवतीसह दागिने विकत घेणार्या सोनारालाही गजाआड केले आहे.
दरम्यान, याप्रकरणी अॅड. निखील बबन वाकळे (वय 34 रा. उदय हाउसिंग सोसायटी, रेणावीकर शाळेच्या मागे, अहिल्यानगर) यांनी सोमवारी (10 मार्च) रात्री उशिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशंसा प्रशांत काळोखे (वय 19 रा. न्यू ख्रिश्चन कॉलनी, स्टेशन रस्ता, कोठी, अहिल्यानगर), किशोर सुधाकर लोळगे (वय 34 रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, हरिमळा, सोलापूर रस्ता, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी अॅड. वाकळे यांच्या लहान भावाचा 7 मार्च रोजी विवाह होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. घरातील सदस्यांनी सर्व दागिने समारंभासाठी वापरले होते. रात्री 7.45 वाजता दागिने कपाटात ठेवण्यात आले. मात्र, 9 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता कपाट तपासल्यावर दागिन्यांचा बॉक्स गायब असल्याचे निदर्शनास आले. यात 64 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे आणि 27 ग्रॅम चांदीचे दागिने चोरीला गेले. यामध्ये राणीहार, नेकलेस, बांगड्या, अंगठ्या, ब्रासलेट, मंगळसूत्र, कानातले आणि लहान मुलांचे दागिने यांचा समावेश होता. यासंदर्भात अॅड. वाकळे यांनी 10 मार्च रोजी तोफखाना पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेत तपास सुरू केला.
तपासादरम्यान, फिर्यादी वाकळे यांच्या भावाच्या लग्नात नवरीसोबत करवली म्हणून आलेल्या एका युवतीनेच चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक तपासाव्दारे सदर युवती प्रशंसा काळोखे हिला ताब्यात घेत विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने सदरचे दागिने चोरी करून ते घराच्या बाजूला पडलेल्या मोकळ्या जागेत खड्डा करून लपवले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन 57 तोळे 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने हस्तगत केले. तसेच, या युवतीने चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने शहरातील सोनार किशोर लोळगे याला विकल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी लोळगेलाही अटक केली आहे.
Web Title: She came to the wedding as a dowry, took 64 tolas worth of jewelry