सत्यजित तांबे यांची भावनिक पोस्ट सोशियल मेडीयावर प्रचंड व्हायरल
Satyajeet Tambe Post | Nashik Graduate Constituency Election: चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल…
Satyajeet Tambe Post Viral : नाशिक पदवीधर निवडणुकीत माघारीचा दिवस देखील संपला, मात्र अद्यापही कोण कोणाला पाठिंबा देतंय, याबाबत अद्यापही साशंकता आहे. असं असताना राजकीय वर्तुळात टीकेचे धनी बनलेले सत्यजीत तांबे मात्र अडचणीत सापडले आहेत. अशातच सोशल मीडियावर सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या संदर्भातील एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल…
“जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्याबरोबर असतील, त्यांना माझा शब्द आहे. माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल, अशा आशयाची पोस्ट असून खाली सत्यजीत दादा तांबे पाटील असे लिहिले आहे. एकूणच नाशिक पदवीधर निवडणूक माघारीचा शेवटचा दिवस असून सत्यजीत तांबे प्रचारात व्यस्त आहेत. संगमनेरातील निवासस्थानातून नुकतेच बाहेर पडले असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. कुठे जाणार, कुणाला भेटणार याबाबत गुप्तता असून एकूणच सत्यजीत तांबे हे जणूकाही एकटे पडल्याचे चित्र आहे, अशा आशयाचा मजकूरही पोस्टसोबत आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सत्यजीत तांबे हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अहमदनगर जिल्ह्यापासून नाशिक, मुंबई आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील युवकांचे नेतृत्व ते करतात. तसेच सोशल मीडियावर देखील ते अॅक्टिव्ह असतात. अशातच नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी पक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि तांबेंच्या अडचणीत वाढ होण्यास सुरुवात झाली. वडील सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारुन सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरला. मात्र त्यानंतर काँग्रेसने जाहीर केलेली उमेदवारी पाण्यात गेल्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठी चांगलेच नाराज झाल्याचे दिसून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पाठिंबा देण्याचे नाकारले.
त्यानंतर वडील सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर आता स्वतः सत्यजीत तांबे यांचे निलंबन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्यजीत तांबे माघार घेणार का? सत्यजीत तांबे हे भाजपच्या वाटेवर आहेत? अशाप्रकारचे सवाल उपस्थित होत आहेत. मात्र माघारीची वेळ संपली. मात्र सत्यजीत तांबे हे अद्यापही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. सद्यस्थितीत सत्यजीत तांबे यांच्या नावाने सोशल मीडियावर भावनिक करणारी पोस्ट व्हायरल होत आहे.
Web Title: Satyajeet Tambe Post Viral
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App