आजच्या काळात शिवाजी महाराजांच्या विचारांची खरी गरज: प्राचार्य मनोहर लेंडे
राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कोव्हिड १९ पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत सर्व शिक्षकांनी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे हे अध्यक्षस्थानी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले स्वराज्य उभे केले. जात, धर्मं, पंथ न मानता त्यांनी सर्वाना न्याय मिळवून देत समता व बंधुत्व प्रस्थापित केले. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे कार्य केले. परस्त्रीला मातेसमान वागणूक देऊन नेहमीच महिलांचा सन्मान केला. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी अध्यक्षीय भाषणातून केले.
यावेळी विद्यालयाचे शिक्षक संतराम बारवकर यांनी आपल्या वक्तयातून रामायण, महाभारतात विविध राजांचे दाखले दिले जातात. हे राजे शूरवीर होते, दानशूर होते, न्यायी होते. पण महान, पराक्रमी राज्यांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा असं म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली. हिंदू असूनही शिवाजी महाराजांनी मुस्लिमांशी कधीही दुजाभाव केला नाही. आपली लढाई मुस्लिमांच्या धर्माशी नसून, त्यांच्या साम्राज्याशी आहे, असे शिवाजी महाराज नेहमी आपल्या सहकाऱ्यांना सांगत. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणाऱ्यांना व त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद केली होती अशा विचारांनी संबोधित केले.
या कार्यक्रमप्रसंगी उपप्राचार्य एस. एस. पाबळकर, पर्यवेक्षक एस.ए. नरसाळे व सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव गिरी सर, अध्यक्षीय सुचना साबळे राजेविनोद, अनुमोदन रमेश शेंडगे, प्रास्ताविक धनंजय पगारे तर आभार मालुंजकर सर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन घिगे बी.एस. व दिंडे सर यांनी केले होते.
Web Title: Sarvodaya Vidya Mandir Rajur Shivaji Maharaj Jayanti