संगमनेर पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील एका नागरिकाने पोलीस ठाण्याच्या आवारातच रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज प्रजासत्ताक दिनी सकाळी घडली आहे. यामध्ये पोलीस कर्मचार्याने वाचविल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये हा नागरिक ५० टक्के भाजल्याचे समजते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खांडगाव येथील अनिल शिवाजी कदम वय ७० या नागरिकाने काही वर्षापूर्वी सादिक रज्जाक शेख याच्याशी घराच्या जागेचा व्यवहार केला होता. या जागेवरून दोघांमध्ये वाद होता. हा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ठ झालेला आहे. तरीदेखील या वादात पोलिसांनी आपल्या घरातील शेख कुटुंबियांना बाहेर काढण्यात यावे अशी कदम यांची मागणी होती.
हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ठ असल्याने पोलिसांना याबाबत कारवाई करणे अशक्य असल्याने कदम यांना पोलिसांनी समजावून सांगूनदेखील ते आपल्या मागणीवर ठाम होते. कदम यांनी आपल्या घरातील वास्तव्य करणाऱ्या शेख कुटुंबियाला बाहेर न काढल्यास प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचे निवेदन पोलिसांना देण्यात आले होते. पोलिसांना अर्ज मिळताच कदम यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला मात्र ते कोठेही आढळून आले नाही.
आज प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयाच्या परिसरात अनिल कदम यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. हा प्रकार पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार राजू गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत कदम यांच्यावर पाणी टाकत त्यांना विझाविले. त्यांनतर कदम याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र ५० टक्क्यापेक्षा अधिक भाजल्याने कदम याला नगरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Web Title: Sangamnner Attempt to set himself on fire by pouring kerosene on his body on the premises