एखाद्याचे जीवन उद्वस्थ होईपर्यंत राजकारण नेलं जातं, बाळासाहेब थोरातांचा कोणावर निशाणा
Balasaheb Thorat on Government : असे राजकारण लोकशाहीला घातक असल्याची खंत.
अहिल्यानगर: “दिशा सालियान प्रकरणातून राजकारणाचा स्तर किती खाली घसरला आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण दिसून येते. राजकारणात मतभेद असतात, पण ते तत्त्वाचे असावेत. एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करण्यापर्यंत राजकारण नेत असाल तर हे राजकारण लोकशाहीला घातक आहे. ठाकरे कुटुंबावर दहशत करण्यासाठी हे प्रकरण पुन्हा पुन्हा काढले जात आहे,” अशी टीका काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहिल्यानगर येथे माध्यमांशी बोलताना केली.
पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “जगातील देश विविध पद्धतीने विकास साधत आहेत. अशावेळी आपल्या देशात दंगली होणे, तणाव निर्माण होणे हे दुर्दैवी आहे. समाजात तणाव निर्माण होणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे. कोणत्याही राज्यकर्त्याच्या काळात समाज आनंदी असला पाहिजे. राज्यात दंगली होतेय हे अभिमानाने सांगणार आहात का? अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितलेला राजधर्म पाळला पाहिजे,” असा सल्ला थोरात यांनी दिला.
“गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. कोणत्याही गुन्हेगाराची जात, धर्म पाहिली जाऊ नये. गुन्हेगाराची एकच जात गुन्हेगारी. त्यामुळे त्याला शिक्षा झाली पाहिजे; परंतु यामध्ये भेदभाव केला जाऊ नये. राज्यात शांतता निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे,” असेही थोरात म्हणाले.
दरम्यान, “राज्यातील संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना अनुदानाचे पैसे मिळत नाही. सरकार म्हणून निराधार व्यक्तींना काही देऊ शकत नसाल तर तुम्ही काम करण्यास योग्य नाही. तुम्ही निराधारांचे पालनकर्ते नाहीत, अशी स्वतःची अर्थव्यवस्था करून ठेवली,” अशी टीका थोरात यांनी केली.
Web Title: Politics is carried out until someone’s life is ruined, Balasaheb Thorat