लाच घेणाऱ्या पोलिसासह एका व्यक्तीला लाचलुचपत पथकाने केली अटक
Ahmednagar Bribe Case: ३० हजार रुपयांचा हप्ता घेणाऱ्या पोलीस अंमलदारसह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत विभागाच्या नाशिक येथील पथकाने अटक केली अटक.
अहमदनगर: अवैधपणे दारू विक्रीसाठी परवानगी देऊन महिना ३० हजार रुपयांचा हप्ता घेणाऱ्या पोलीस अंमलदारसह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत विभागाच्या नाशिक येथील पथकाने अटक केल्याची घटना घडली आहे.
अंमलदार शैलेश गोमसाळे व खासगी व्यक्ती वैभव साळुंके (वय 35 रा. नगर) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना इंगळे, पोलीस अंमलदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, चंद्रशेखर मोरे, शरद हेंबाडे, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी पाईपलाईन रोडवरील एकविरा चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. तोफखाना हद्दीतील तक्रारदार यांना विना परवाना दारू विक्री करण्याची परवानगी देवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात गोमसाळे याने खासगी व्यक्ती साळुंके यांच्यामार्फत तक्रारदाराकडे 30 हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.
दिलेल्या तक्रारीवरून 21 जुलै रोजी लाच मागणी पडताळणीदरम्यान लाच मागितल्याचे सिध्द झाले होती. दरम्यान मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी एकविरा चौक परिसरातील सिटी स्टोअरजवळ खासगी व्यक्ती साळुंके याने गोमसाळे याच्यावतीने तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रूपयांची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.
Web Title: One person was arrested by the Bribery Squad along with the bribe-taking policeman