पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता
Breaking News | Kolhapur: ट्रॅक्टरमधून जात असताना चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून सातजण वाहून गेले.
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील अकिवाट-बस्तवाड मार्गावर सार्वजनिक नळ पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ट्रॅक्टरमधून जात असताना चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून सातजण वाहून गेले. यामध्ये अकिवाटच्या सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाला, तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इक्बाल बाबासाहेब बैरागदार व प्रगतशील शेतकरी अण्णासाहेब हासुरे हे दोघेजण बेपत्ता झाले. ट्रॅक्टरचालक रोहिदास माने गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या पाच बोटी दाखल झाल्या असून शोधमोहीम सुरू आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, माजी जि. प. सदस्य इक्बाल बैरागदार, सुहास पाटील, श्रेणिक चौगुले, अनिकेत कोथळी असे सहाजण सार्वजनिक नळ पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी गावातून पायी जात होते. दरम्यान, अण्णासाहेब हासुरे हे ट्रॅक्टर घेऊन शेताकडे जात होते. हासुरे यांनी त्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवले. थोड्या अंतरावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटला. यामध्ये सहा लोक होते. त्यापैकी इक्बाल बैरागदार, अण्णासाहेब हासुरे हे बेपत्ता असून, सुहास पाटील यांचा बुडून मृत्यू झाला. दोघेजण पाण्यातून पोहत बाहेर पडले. तर गंभीर जखमी ट्रॅक्टरचालक रोहिदास माने यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Web Title: One dead, two missing after tractor overturns in flood waters
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study