शाळकरी मुलीवर घरात घुसून चाकूने हल्ला, गुन्हा दाखल
नेवासा: नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथील सहावीत शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
या मुलीच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी १० वाजता त्या शाळकरी मुलीचे आई वडील मजुरीच्या कामावर गेले होते, त्यानंतर साडे बारा वाजता त्या मुलीचे चुलतेही कामावर गेले होते. दरम्यान भाऊ चुलत्यांच्या घरी खेळायला गेला होता. चुलत बहिण गवत आणण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारी पावणे एकच्या सुमारास मुलगी घरातील फरशी पुसत असताना त्यावेळी अचानक अज्ञात व्यक्तीने घरात घुसून तिच्यावर चाकूने वार केले. तिच्या उजव्या व डाव्या हातावर, तोंडावर चाकूने वार केले. तिने आरडाओरडा केल्याने तिचा गळा दाबला मात्र तिने प्रतिकार करत हाताचा चावा घेतल्याने त्या व्यक्तीने तिला सोडले जाताना त्यांनी घराची बाहेरील कडी लावून गेला.
ही घटना घडल्यानंतर मुलगी मोठमोठ्याने ओरडत होती. त्यानंतर चुलत बहिण घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीचे वडील व चुलते यांनी नेवासा फाटा येथे रुग्णालयात नेले. तिच्या जबाबावरून अज्ञात व्यक्तीविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Nevasa News girl broke into the house and attacked