Marathi Kavita, Poem, Love | मराठी कविता संग्रह
Marathi Kavita, Poem, Love | मराठी कविता संग्रह
चला तर मग आज आपण आनंद घेऊया मराठी कविता संग्रहाचा यामध्ये Marathi Kavita on-prem, Marathi Kavita for lover, Marathi Kavita for love, Marathi Kavita on Aai, Marathi Poems for love समावेश आहे.
तू पाळला संयम गड्या…
अनागोंदी कारभार सारा
नियोजनाला नाही थारा,
सांगून थकलंय मायबाप सरकार
आता तरी विचार करा…१
नको पडूस घराबाहेर तू
समदं होईल व्यवस्थित,
तू पाळला संयम गड्या तर
आपलीच होईल रे जीत…२
कोरोना आहे जंत बेरकी
स्वाभिमानी ही आहे खूप,
तू जर नाही गेलास बाहेर तर
स्वतःच संपेल आपोआप…३
थंडी – ताप, सर्दी – खोकला
दिसले एखादे जरी लक्षणं,
सरकारी दवाखान्यात जा नि कर
कुटुंबाबरोबरच देशाचे ही रक्षण…४
नको बाळगू संकोच मनी
बन खरा जागरूक माणूस,
तुझ्या एका चुकीमुळे वेड्या
नाही उरणार कुणाचाही मागमूस..५
अर्ध्या तासाने कर स्वच्छ हातपाय
नि टाळ एकमेकांचा तू जनसंपर्क,
नाहीतर सारे गमावून बसशील
तुझ्यासारखा तूच असशील जगी मूर्ख…६
दक्ष हो, सावध हो जागरूक हो
तुझ्याच हाती आहे अवघी पिढी,
तुझी एक चूक किती महागात पडेल
तू मोजू ही नाही शकणार एवढी मडी…७
एक संगमनेरकर
आहे कुणाचा अंत,
तरी मानवा नाही जराशी
आहे बघा हो उसंत ….१
मोह माया नि पैसा अडका
सारे व्यर्थच हो येथे,
तरी यांच्या लोभापायी
विसरला मानव नाते ….२
नियतीचा ही केला ऱ्हास
उन्माद बेहिशोब केला,
स्वार्थी वृत्ती पायी अखेर
आज विनाश ओढवला ….३
आपणही लागतो देणे
नियतीचे काहीतरी,
म्हणून विनवितो तुम्हा दिगंबर
राहा थोडे दिवस घरी ….४
जमाव टाळा, नका करू सोहळा
घाला इच्छांना आपल्या आळा,
हाही काळ निघून जाईल
तुझी फक्त थोडा संयम पाळा …५
अति तेथे माती हा
निसर्गाचा आहे नियम,
जगाच्या कानाकोपऱ्यात
तो त्रिवार सत्य कायम …६
ठाऊक नाही कोठे कसा
होईल मृत्यूचा सामना,
विश्वाच्या अंतास कारणीभूत
होईल का ? हा जंत कोरोना ….७
छत्रपती
सळसळत रक्त
डोळ्यात आग,
रोखूनी श्वास
बघतोय वाघ…१
अशी ही जात
मर्द मराठा,
म्हणून शाबूत
घरचा उंबरठा…२
जयांमुळे अंगणी
डोलते ही तुळस,
शाबूत मंदिरांवर
अजूनी हा कळस….३
रयतेचा हा वाली
गनीमांचा रे काळ,
सोन्याच्या नांगराने
ज्याने नांगरला माळ…४
स्वप्न केले पूर्ण आईचे
निर्मियले हे स्वराज,
अजूनी तो छत्रपती
असे रक्षिण्या सज्य…५
तू पहा मला वळूनी
सांज खुळी ही वेडी पाखरे
उडती तारांगणी,
प्राजक्ताचा सडा पडतो
माझ्या या अंगणी….. १
मनी वसे ते स्वप्नी दिसे
वास्तव साकारुनी,
आरे विधात्या तुझा हा पामर
सदैव राहिलं ऋणी… २
परंपरागत हितशत्रुंचि
घेईल मने जिंकुनी,
स्वकीयांच्या कटकाव्याने
डोळे येती भरूनी….. ३
कंठातून हा आलाप येतो
बघ कसा झंकारुनी,
जीवन मार्ग चालतो आहे
फक्त तुला आठवूनी… ४
जातेस मजला दुःखी कष्टी
एकटयाला सोडुनी,
जाताना सये फक्त एकदा
तू पहा मला वळूनी…. ५
शंभूराजे
ऋणी मराठी तुमची
शंभूराजे
धनी मराठ्यांचे तुम्ही
शंभूराजे,
तळपती भवानी तुम्ही
शंभूराजे,
निष्ठावंत सूर्य तुम्ही
शंभूराजे,
स्वामी अजिंक्य तुम्ही
शंभूराजे…
माणिक मोत्यांची खाण
शंभूराजे,
मराठी मुलुखाचा प्राण
शंभूराजे,
अलौकिक असे ज्ञान
शंभूराजे,
रयतेचे तारणहार
शंभूराजे….
सुराज्य…
एकटाच लढला तो शत्रूंशी
घेऊन मूठभर मावळे,
नाही डगमगला नाही झुकला
काढले गनिमांनी डोळे…
मांड घोड्यावर ना उसंत जराही
ध्यानी मनी फक्त स्वराज्य,
जिजाऊंच्या शूर पुत्राने निर्मिले
आऊंच्या स्वप्नातील सुराज्य…
धन्य त्या आऊसाहेब
आणि धन्य ते शिवराय,
तुमच्यामुळेच मराठी मुलुख
आजही शाबूत हाय…
दैवत छत्रपती
निळ्या नभावं भगवी शाई
तळपले समशेरीच पातं,
मराठमोळी जात रांगडी
आहे इमानाशी नातं…१
मन हळवे जरी बाहू पोलादी
निधड्या निडर औलादी,
स्वयं निर्मीयले स्वराज्य आणिक
निर्मीयली हो गादी….२
दहा हत्तीचे बळ अंगी तरी
उन्माद नाही हो खुळा,
शिवराय आमुचे दैवत आणिक
कपाळी भगवा टिळा….३
सह्याद्रीचा वाघ ढाण्या तो
गनिमाचा रे काळ,
सोन्याच्या नांगराने त्याने
नांगराला ओसाड माळ…४
चरणावरी नत शीर माझे हे
दैवत छत्रपती, दैवत छत्रपती,
वंदन करतो तुला शिवबा
तू जगताचा अधिपती…५
माझी बोली…
पडझड झाली भोळ्या मनाची
उध्वस्त स्वप्नांचा गाव सारा,
सांग कश्या गं तू उभारल्या
थोपविण्या भावनांना ह्या कारा…
उधाणलेला हा अथांग सागर
तरी कोरडा कसा तुझा किनारा,
नाही शिवत का ? गं तुला वेडे
यातनामय हा निष्प्राण वारा…
रक्ताळलेली तनं नि
विखुरलेली ही मनं,
सांग कुणा सांगू मी
माझ्या मनीच गाऱ्हाणं…
शिवशिवणारा स्पर्श अबोली
नाही जाणली तू माझी खोली,
नात्यांच्या बाजारात का? अशी
तू कवडीमोल लावली माझी बोली…
कोवळी चक्षु ….
जराही काहीच नाही वाटलं का गं
त्या गोंडस कोवळ्या लेकरासाठी,
होतं तुझं मातृत्व स्वार्थी नि ढोंगी
लाचार होते गं शब्द तुझ्या ओठी…१
नाही जाणल्या तू त्याच्या गरजा
न जाणली त्याच्या मनीची सल,
तुझी स्वार्थी वृत्ती नि व्यभिचार
जाणते आहे ही दुनिया सकल…२
आई नावालाही कलंक आहेस तू
का दिलास निष्पाप जीवाला जन्म,
काहीच नाही कळत त्याला अजून
कोणती त्याची जात नि कोणता धर्म…३
निरागस, निर्विकार पण तरी निस्तेज
जन्मदात्या आईस जन्मतःच झाला बोझ,
भावनाशून्य डोळ्यांना तुझीच गं आस
वाटेवर रोखलेली कोवळी चक्षु सतेज…४
सत्यवादी बाप
शेतामध्ये राबताना
लागत होती धाप,
सातासमुद्रापल्याड
गेलाय आता बाप…
तूच दिली रे शिकवण
सांगितले जगाचे माप,
सत्यवचन, खरेपणा
वाढले येथे आता पाप…
पैका फोल माणुसकीला
होते तुझे झुकते माप,
खोटेपणा सर्रास माजला
कुटील डावही अमाप….
रोज कित्येक अब्रु वेशीला
निर्भीडपणे टांगल्या येथे,
आमुक रावचे तमुक मित्र
हजारोंचे जमती जथ्ये….
माणूस जवळ आला बाबा
पण माणुसकीलाच पारखा,
सत्यवचन अहिंसा ही मूल्य
विसलाय गांधीजींचा चरखा…
सांगा बाबा तुमच्या स्वप्नातील
स्वतंत्र भारत असा होता,
खोटेपणा जिंकतो नेहमीच
सत्याचा नेहमी झुकलेला माथा…
दावे…
एक नजर पाहिजे गडया रत्नपारखी
दुनिया पाहते का सांग श्वापदासारखी…
रीत दुनियेची गड्या आहे रं बेरकी
आपलीच पिलावळ डसे नागासारखी…
आई असून लेकरं झाली रं पोरकी
आपलीच माणसं आपल्यांना झाली परकी…
चाड नाही भीड नाही उरली न भीती
कशी जगतात येथे माणसं लाचारासारखी…
टपलेत किती गिधाडं लचके तोडण्या
वागतात आपली माणसं दुश्मनासारखी….
रंक आणि राव भेद न उरला येथे
नाती झाली स्वस्त भाजीपाल्यासारखी….
खोटे झाले खरे, सत्य दारीच रे उभे
उरले कोर्टामध्ये दावे, खऱ्या नितीमत्तेसारखे…
” माझ्याही प्राक्तनीचे दे तिला…!!”
जेव्हा कळेल तिला हे जीवन, देवा
उशीर मात्र झालेला नसू दे,
काय द्यायचे तेवढे तू दुःख दे मला
तिच्या चेहऱ्यावरती सदा हसू दे..१
लवलेश नसू दे, नसू दे तमा कशाची
तिच्या सर्व इच्छांची पूर्ती होऊ दे,
मी जरी राहिलो अनामिक जगा
तिची सर्वदूर कीर्ती होऊ दे…२
स्वप्न होऊ दे साकार तिच्या नयनीचे
यश मिळू दे तिच्या रे अपार कष्टा,
जरी गाठली उत्तुंग पायरी यशाची तिने
न ढळू देऊ तिची त्या पायरीवरील निष्ठा…३
मान – सन्मान, पत – प्रतिष्ठा अन
नित्य उंचावू दे तिच्या यशाचा आलेख,
उकल मिळो सर्व प्रश्नांची झणी
मनी नसू दे देवा कोणतीच मेख…४
सोज्वळ, सालस आणि निरागस
असेच राहू दे तिच्या मुखावरील भाव,
माझ्याही प्राक्तनीचे दे तिला तू
अमर होई दे देवा, तिचे जगती नाव…५
बाप …
बाप निखळ नितळ झरा
आई जगण्याचा अर्थ खरा,
कधीच नाही शिवणार वारा
जया आई वडिलांचा सहारा …१
अर्थ मिळे जीवनाला
जन्म लेकराला देता,
आई वात्सल्य प्रतिमा
किती अथांग हा पिता …२
ठाव नाही लागे त्याचा
अंतरी धुसमुस बाळा,
सुख देण्या कुटुंबाला
दोघे सोसतोय कळा …३
आई पवित्र मंदिर
बाप मंदिराचे दार,
तुझ्या भल्यासाठी लेका
जगती होऊन उदार …४
ठेव जाण त्यांच्या त्यागा
नको करु उगा त्रागा,
आई बापाविन जगी
स्वामी आहे रे अभागा …५
खेळ नियतीचे
मी ढग पावसाळी
तू झुळूक वेडी वाऱ्याची,
जीवनात कुणीच नाही या
देण्या साक्ष रे खऱ्याची …१
नाही मार्ग माझा चुकीचा
नाही कर्म केले चुकीचे,
मी सोसतोय यातनांना
न कळे खेळ नियतीचे …२
काय आहे प्राक्तनी या
सांग एकदाची बापा,
न उरतील डावपेच
होईल जगण्याचा मार्ग सोपा …३
माझे जीवन …
काहीच चूक नाही माझी
तरी सजा भोगतो आहे,
देवा तुझ्या या जगती मी
उदासवाणा जगतो आहे … १
माझे माझे म्हणून ज्यांना
हृदयी मी रे जागा दिली,
दगा देऊन त्यांनीच माझी
कशी उडवली बघ खिल्ली …२
सुखी क्षण माझ्या नशिबी
लिहिण्याचे विसरला कसा,
कष्ट करून बघ शरीराच्या
उघडया पडल्यात रे नसा ….३
काळ बदलला, वेळ बदलली
बदलले नाही रे माझे प्राक्तन,
विश्वास आहे तुझ्यावर म्हणून
हवाली केले तुझ्या हे जीवन …४
नियतीचे नियम
कोरोनाचा कहर
जगाचा अंत दिसे,
पाण्याविना हे मासे
मनुष्य भासे …१
लोचनांच्या अंतरी
ह्या तारका लोपल्या,
शशी लीला संपल्या
का ? वाटतसे …२
नैराश्याच्या गर्तेत
भावनाशून्य जग,
काळजीची ही धग
करुणामय ….३
करू नका हो घाई
दुजा पर्याय नाही,
तिमिर दिशा दाही
कोंदटलेला … ४
घरी राहा निरोगी
टाळा जनसंपर्क,
फुके सारेच तर्क
आजमितीला …५
गरज आहे घरा
तू ऐकणा रे जरा,
तुच आहे आसरा
आप्त जनांचा ….६
हेही दिस जातील
धर जरा संयम,
नियतीचे नियम
पाळ माणसा …७
काजवा
आज अचानक डोळ्यासमोर
चमकून गेला एक काजवा,
म्हणूनच तर सकाळपासून
लवत होता डोळा उजवा…१
आशेच्या कुरळ्या केसांत
गुरफटला होता थोडा वेंधळा,
मनाच्या पडीत बागेतही कसा
अंकुरून आला हा जोंधळा…२
लुकलूक त्याची जगावेगळी
मनामध्ये त्याचेच रे कुतूहल,
खोलवर रुतलेली आहे मनामध्ये
आपल्याच माणसांनी दिलेली सल..३
स्वतःच्या स्वार्थीवृत्तीपायी लोक
नात्यात आणतात हा दुरावा,
लफडं दुसऱ्यासंग करून बायको
करते नवस लवकर नवरा मरावा…४
पायाजवळ पाहण्याच्या नादात
दूरवरचे पहायचेच राहून गेले,
विनाकारण संशयामुळे कित्येक
सुखीसंसार उगाच लयास गेले…५
आता खरंच पटलंय मला ही
कि जगामध्ये कलियुग आलाय,
लग्न, लग्नाची बंधन नि सात फेरे
आता हे सार बिनबुडाच झालाय…६
मुलगी करतेय क्षणात आपल्या
बापाच्याच इज्जतीचा पंचनामा,
उलटे धंदे स्वतःचं करून लावते
आपल्या नवऱ्याला ऊगा कामा..७
( शब्दविहंग )
डोळ्यात साठल पाणी
म्हणे
आठवण काढली कोणी
कष्टतो नेहमी रानी
करून हाडांच पाणी…
त्यासम न मोठा दाणी
फिरे एकला अनवानी
भ्रांत तयाला फक्त
सुखात राहावे पिलांनी…
भाव न दुजाभाव मनी
न वैरी त्याचा कुणी
कष्ट माझ्या बापाचे
पाहिले सर्व गावानी…
कधी कुणापुढे तो
व्यर्थ झुकला नाय
हीच तर शिकवण मला
वारसात मिळाली हाय….
रक्तात त्याच्या ईमान आहे
खोटेपनाची त्याला चीड़ आहे
ऊगा कुणाला भिडण्या बद्दल
त्याच्या मनी तिड आहे….
भिंत मनातील…
भिंत ही माझ्या मनातील काळी आहे
पापणीची ओलं सखे पावसाळी आहे…१
बोचऱ्या जखमा अति या अंतरी गं
वेदनेला गाळण्या ह्या कुठे जाळी आहे…२
समजू शकेल माझी व्यथा न सांगता
सांग अशी कोणती मूक आरोळी आहे…३
नाही मिळाले फळ कष्टाचे अजूनही
बघ साजणे, रीती माझी गं झोळी आहे…४
अंत नाही यातनांना बघ जराही
आशा माझी ही वेडी का खुळी आहे…५
जातील निघून हेही दिवस दिगु तुझे
काय लिहीले सांग या कपाळी आहे…६
(शब्दविहंग)
वळीवं…
आले ढग गोळा होऊन
बरसू दे रे आता वळीवं,
रखरखलेल्या मातीमध्ये
फिरू दे बळीचा कुळवं…१
ढेकळांना पाळी घालू दे
सांधु दे भेगाळलेली भुई,
वळीवाच पाणी पडून हा
नाचू दे मयूर रानी थुईथूई..२
वावटळीने ह्या फेर धरला
शिवल्या पर्णराशी गगनी,
सर सर सर सर सरी बरसल्या
टपोऱ्या गारांचा सडा अंगणी…३
कोरट मृदूगंध वाऱ्यावरी स्वार
वातशीळ आळवी राग मल्हार,
ढगांचा नगारा वाजे अंबरी खुळा
वळीवं घेई आज सर्वांची शाळा..४
हिरव्यागार झाडांची गर्द डहाळी
मिरगाची चाहूल नि आनंदी बळी,
करुण अन निर्धवलेल्या डोळ्यात
दिसे उठून बळीच्या गालावर खळी…५
( शब्दविहंग )
पाऊलखुणा…
हळव्या हृदयी गंध आठवांचा सापडेना
थोतांड सांगण्या मोह कुणालाच आवरेना…१
डंख आठवांचा ह्या विस्तव जीवघेणा
आपल्यांत आपलेपणाचा सूर गवसेना…२
मानतो की असेल विसंगत स्वभाव माझा
का ? आपल्यांचाच परकेपणा सोसवेना…३
वेगळा असेल जरासा पण निर्दयी नक्की नाही
माझ्यामुळे सारेच दुरावलेले आता बघवेना…४
सर्वच लाभो तुला, जे तु गं चिंतिलेले
प्रसन्नचित्ती जीवनी उमटे प्रसन्न पाऊलखुणा…५
भोग संचिताचे आपुल्या न चुकले कधी कुणा
असून सोबती सारे का ? जीवनी एकलेपणा …६
अभंग …
सुखी ठेव देवा
धनी कुंकवाचा,
जन्म मानवाचा
पुन्हा नाही … १
पापणी पल्याड
डोह आसवांचा,
लोभ न कशाचा
ठेव देहा …… २
वेदने असावा
गंध दाहतेचा,
निमूट सोसावा
क्लेश स्वतः …३
कोणती अपेक्षा
नको कोणाकडे,
नित्य रे वाकडे
तोंड त्यांचे…. ४
मानले आपुले
हाच माझा गुन्हा,
नाही देवा, पुन्हा
चुकणार…. ५
कवी – दिगंबर कोटकर रा. देवगाव ता. संगमनेर
आपल्याला आमच्या कविता Marathi Kavita, Poem कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
See also: Sangamner Akole News
See also: Sai Baba Images
Web Title: Marathi Kavita and Poem for lover Life prem wife
मराठी कवितांना नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल
व मराठी कविता जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचविल्याबद्दल धन्यवाद
Nice kavita
Nice Marathi kavita
Nice kavita