अहमदनगर: मराठा आंदोलकांचा मोदींच्या कार्यक्रमावर बहिष्कार
Ahmednagar | ShevgaonNews: बसच्या काचा, बसवर चिकटविलेले सभेचे पोस्टर फाडून अंदोलकांनी आपला संताप व्यक्त.
शेवगाव: सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीवरून शिर्डी येथे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार मराठा अंदोलकांनी जाहीर केला होता. शेवगाव तालुक्यात कार्यक्रमासाठी जाणार्या एसटी बस अनेक गावांनी अडवून माघारी पाठवल्या. तर काही आक्रमक आंदोलकांनी बसच्या काचा फोडल्याच्या घटना घडल्या.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेली मुदत संपल्याने व जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केल्याने सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. काल शिर्डी तसेच अहमदनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. पंतप्रधानाच्या सभेसाठी तालुक्यांच्या गावागावांत पाठविण्यात आलेल्या एसटी बसेस आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत हसनापूर, कोळगाव, मंगरूळ, अंतरवाली, ढोरजळगाव येथून रिकाम्या पाठविण्यात आल्या. तसेच शेवगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातून शिर्डीकडे निघालेल्या काही बसेस भातकुडगाव फाट्यावर आंदोलकांनी अडवून पुन्हा त्या गावी पाठविल्या.
गुरुवारच्या कार्यक्रमासाठी शिर्डी येथे जाण्यासाठी शेवगाव आगारात गेवराई, येथून 20 तसेच धारूर व माजलगाव आगारातून प्रत्येकी अठरा अशा एकूण 56 एसटी बसेस आल्या होत्या. त्या शेवगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी सकाळी सभेला जाणार्या लोकांसाठी पाठविण्यात आल्या. गावागावांत सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून आक्रमक झाल्याने जमावाने त्या एसटी बसला अडवले. तालुक्यातील मंगरूळ येथे आलेल्या एसटी (क्रमांक एम एच 14 बीटी 21 58) या बसच्या मागील बाजूची काच जमावाने फोडल्याची घटना घडली. तसेच काही ठिकाणी बसवर चिकटविलेले सभेचे पोस्टर फाडून अंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला.
मराठा आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक एसटी बस माघारी फिरवण्याची वेळ भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली. तर बसला नुकसान पोहचू नये यासाठी 35 ते 40 एसटी बस गाड्या शहरातील पाथर्डी रस्त्यावरील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात लपवण्यात आल्या होत्या.
Web Title: Maratha protesters boycott Modi’s program
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App