दिवा लावून एकसंधतेचे दर्शन घडवू – माजी मंत्री पिचड
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना विरोधातल्या या लढ्यात योगदान देऊ दिवा लावून एकसंधतेचे दर्शन घडवू – माजी मंत्री पिचड
अकोले ( प्रतिनिधी):देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वा. ९ मिनिटे घरातले दिवे मालवून मेणबत्ती , पणती , मोबाईल फ्लॅश लाईट , टॉर्च या माध्यमातून बाल्कनीतून प्रकाश करण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत कोरोना विरोधातल्या या लढयात आपले योगदान द्यावे असे आवाहन माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले आहे.
या आवाहनासंदर्भात पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हर हर महादेव ही गर्जना करून युद्ध जिंकता येत नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनाही माहित होते. निव्वळ चले जाव ची घोषणा देवून इंग्रज पळून जाणार नाहीत हे महात्मा गांधींनाही माहित होते. निव्वळ तळ्याचे पाणी पिल्याने जातीयता नष्ट होणार नाही हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही न माहित होते.निव्वळ रक्त मागून स्वातंत्र्य मिळणार नाही हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना माहित होते.निव्वळ जय जय रघुवीर समर्थ म्हणून जनसमुदाय एकत्र येणार नाही हे रामदास स्वामींनाही माहित होते. याचप्रमाणे दिवे लावून, टाळ्या वाजवून करोना जाणार नाही हे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनाही माहित आहे. या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते . जे वाढणे आजच्या संकट समयी काळाची गरज आहे. महात्मा गांधीजींनी मूठभर मीठ उचलून जनतेच्या मनात देशप्रेम जागविले . या सर्व कृती जरी क्षुल्लक वाटत असल्या तरी मनोबल उंचावणाऱ्या , मनोधैर्य वाढविणाऱ्या आहेत. दिवा लावून अंधःकार दूर करणे हे आमच्या भारतीय संस्कृतीचे संस्कार आहेत.
आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जो लढा आपण भारतीय देत आहोत त्या लढ्यात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे आवाहन केले आहे . त्याला प्रतिसाद देत हा लढा एकसंधतेने जिंकू असा विश्वास भाजपचे युवा नेते वैभवराव पिचड, भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, जेष्ठ नेते गिरजाजी जाधव, यशवंतराव अभाळे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, राहुल देशमुख, सुनील उगले, सुशांत वाकचौरे यांनी व्यक्त केला आहे.
Website Title: Latest News show the unity by lighting a lamp