मोलमजुरी करणाऱ्या महिलेची एटीएममध्येच प्रसूती
नेवासा: मजुरी करणाऱ्या एका कुटुंबातील गर्भवती महिलेने नेवासे तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील एटीएममध्येच प्रसूती केली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
करोना विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर राज्यातील, परराज्यातील कुटुंबे आपापल्या गावी जाताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे गाडी वाहने मिळत नसल्यामुळे अनेक जण आपापल्या गावी पायी निघालेली दिसतात. नगर-औरंगाबाद रस्त्यावर तर हे दृश्य नेहमीच दिसते. प्रशासनाकडून वारंवार स्थलांतर करणाऱ्या मजुरांची सोय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी, मजुरी करणारी ही कुटुंबे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. असेच यवतमाळ जिल्ह्यातील वागत (ता.महागाव) येथील संदीप विठ्ठल काळे (वय २४) शेतमजूर, पत्नी निर्मळ संदीप काळे व तीन वर्षांची मुलगी आरती काळे हे कुटुंब पुणे येथील कोरेगाव (बोलाई) येथे शेती कामासाठी आले होते.
मात्र करोनाच्या संकटातून बचाव करण्यासाठी आणि अडकलेल्या ठिकाणाहून आपल्या गावी जाण्यासाठी १५ एप्रिल रोजी निघालेले होते. हे कुटुंब तीन दिवसांच्या प्रवासानंतर नगर-औरंगाबाद रस्त्यावरील वडाळा बहिरोबा येथे सायंकाळच्या सुमारास आले. तेथे गर्भवती महिलेला अचानक प्रसुती वेदना सुरू झाल्याने या महिलेला तिच्या कुटुंबीयांनी एका एटीएमच्या आडोशाला नेले. ही बाब वडाळा बहिरोबा येथील कामगार तलाठी श्रीनिवास भाकड आणि त्यांचे सहकारी निलेश मोटे यांच्या लक्षात आली. त्यांनी वडाळा आरोग्य उपकेंद्रातील परिचारिका सोनाली न्यालपेल्ली व वनिता काळे (नवगिरे) यांना बोलावून घेतले. त्यांनी या महिलेची सुखरूप सुटका केली आणि त्या महिलेने एटीएममध्ये गोंडस बाळाला जन्म दिला. पोलीस प्रशासनाने त्या कुटुंबीयस मदत केली. प्रशासनाने या महिलेस व नवजात बालकास पुढील उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. बाळ व आई दोघेही सुखरूप असल्याचे समजते.
Website Title: Latest News Offensive woman delivery at ATM