भीक मागण्यासाठी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, आरोपी श्रीगोंदेची महिला अटकेत
पुणे | Pune: पुणे येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भीक मागण्यासाठी आणि लग्नात हुंडा उकळण्यासाठी एका तीन वर्षांच्या मुलीचं पुण्यातून अपहरण (Kidnap) केल्याची धक्कादायक घटना घडली. तीन वर्षांच्या मुलीला श्रीगोंदा इथे घेऊन जाणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. .
पुणे कोरेगाव पार्क पोलिसांनी सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील उषा नामदेव चव्हाण (40) हिला ढोले पाटील रस्त्यावरील फूटपाथवरुन तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अटक केली. ही घटना 23 मे रोजी घडली. महिलेने गुन्ह्याच्या वेळी बाळगलेल्या हातातील पिशवीच्या नावाच्या उल्लेखावरून पोलिसांनी तपास करीत आरोपीचा शोध घेतला आहे.
मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. उषा चव्हाण असे या आरोपी महिलेचं नाव आहे. ती श्रीगोंद्याचीच रहिवासी आहे. उषा चव्हाण ही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात ढोलेपाटील रोडवर एका फुगे विकणाऱ्या महिलेच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण झालं होते. ही मुलगी आईसह एका रिक्षात झोपली होती. तेव्हा या मुलीला अलगद उचलून पळवून नेण्यात आले. पोलिसांनी तब्बल 5 दिवस 250 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि हातातल्या पिशवीच्या नावावरुन थेट आरोपी महिलेचे घर गाठले आणि आरोपीला अटक केली.
अपहरण झालेल्या मुलीला भीक मागायला लावणं तसेच पुढे तिचं लग्न करून मग हुंडा उकळणं यासाठी तिचे अपहरण केले होते.
पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की, आरोपींनी मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला शालीने गुंडाळले. तिच्या बॅगेवर असलेल्या किरकोळ विक्रेत्याच्या नावामुळे आम्हाला तिचा शोध घेण्यात आणि अटक करण्यात मदत झाली. किरकोळ विक्रेत्याच्या अहमदनगरमध्ये श्रीगोंदा आणि काष्टी येथे शाखा आहेत. पोलीस पथकाने श्रीगोंदा येथे जाऊन मुलीचा शोध घेतला. उषा चव्हाण ही मुलगी घेऊन आल्याची खात्री केल्यानंतर स्थानिक माहिती देणाऱ्यांनी तिचा ठावठिकाणा पोलिसांना सांगितला. तिला रंगेहाथ पकडण्यात यश आले आहे. मुलगी तिच्या घरातच सापडली.
वरिष्ठ निरीक्षक विनायक वेताळ, निरीक्षक दीपाली भोसले आणि सहायक निरीक्षक अमोल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलिसांच्या पथकाने आरोपीला तिच्या श्रीगोंदा येथील राहत्या घरातून अटक (Arrest) केली.
Web Title: Kidnap of a three-year-old girl for begging