अहिल्यानगर: जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा तडाखा, आज ऑरेंज अलर्ट
Breaking News | Ahilyanagar Rain Update: अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे.काल अकोले, पाथर्डी, शेवगाव, नेवाशाला अवकाळी पावसाने तडाखा दिला.
अहिल्यानगर: गत दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे.काल अकोले, पाथर्डी, शेवगाव, नेवाशाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. पाथर्डीत काही भागात गारपीट झाली. नेवासा तालुक्यात वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. तर एका मंदिराच्या कळसावर वीज कोसळली. नगरशहर, श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, पारनेर, शेवगाव व श्रीगोंद्यासह अन्य भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळला.
पाथर्डी तालुक्यात रविवारी आणि सोमवारी सायंकाळी दैत्यनांदूर व सोनोशी परिसरात अचानक वातावरण ढगाळ होऊन वादळी वार्यासह गारपिटीचा जोरदार पाऊस झाला. यावेळी अनेक ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब वाकले आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. रविवारी दैत्यनांदूर येथे एक व सोनोशी येथे तीन घरांची पडझड झाली असून गावकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोमवारी पुन्हा पाथर्डी तालुक्यातील वातावरणाने पलटी घेतली. दुपारी विजेच्या कडकडाटासह, भीतीदायक आवाजात वीज कोसळली. तिनखडी येथे एका बैलाचा, तर माणिकदौंडी येथे एका म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला. पाथर्डी शहरातील लोणार गल्ली येथे वीज कोसळली.
दरम्यान, नगरसह राज्याच्या विविध भागात गेल्या आठ दिवसांपासून भाग बदलत अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने नगर जिल्ह्याला आज मंगळवार (दि.13) रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. दरम्यान यापूर्वीच हवामान खात्याने नगर जिल्ह्यात 14 तारखेपर्यंत वादळी वार्यासह अवकळी बरसणार असल्याचा इशारा देत पावसाचा येलो अलर्ट दिलेला होता. जिल्ह्यात मागील महिन्यात तीन दिवस सहा ते सात तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर मागील आठवड्यात राहुरी आणि पारनेर तालुक्यासह नगर, पाथर्डीच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
यावेळी झालेल्या वादळात शेतकर्यांचे विविध पिकांचे नुकसान झालेले होते. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा वाढवल्याने शेतकर्यांच्या मनात धडकी भरली आहे. रविवारी जिल्ह्यात सांयकाळच्या वेळी विविध भागात वादळ झाले असून यात काही प्रमाणात नुकसान झालेले असले तरी जिवित अथवा वित्तीयहानी झालेली नव्हती. अवकाळी पावसामुळे नगरकरांना उन्हापासून दिलासा मिळाला असून आठ दिवसांपासून दिवभर उन्ह सावलीचा खेळ सुरू आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे गारवा वाढला आहे.
भंडारदरात धुव्वाधार पाऊस मुळा पाणलोटातही हजेरी
भंडारदरा: उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण आणि परिसरात काल सोमवारी सायंकाळी धुवाधार पाऊस झाला. गत तीन दिवसांपासून या भागात अवकाळी वादळी पावसाने मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे भंडारदरा धरण आणि परिसरातील सौंदर्य पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची धांदल उडाली. शुक्रवारी रात्री पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने शनिवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 25 दलघफू पाणी दाखल झाले. रविवारी रात्रीही धरण परिसरात पाऊस झाला.
सोमवारी त्यामुळे सायंकाळपर्यंत धरणात नव्याने 21 दलघफू पाणी दाखल झाले होते. काल सोमवारी सायंकाळी 6 वाजेपासून धरण पाणलोटात धुवाधार पाऊस सुरू होता. त्यामुळे आज मंगळवारी सकाळपर्यंत धरणात नव्याने पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. काल सोमवारी सायंकाळपर्यंत झालेल्या पावसाची नोंद अशी (मिमी) भंडारदरा 7, घाटघर 19, पाजरे 11, रतनवाडी 16, वाकी 6, अकोले 3.
11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा 3918 दलघफू (35.49 टक्के) झाला होता. धरणातून 2680 क्युसेकने आवर्तनपोटी पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडेत 1823 दलघफू (21.89 टक्के) होता. या धरणातून कालव्यांना आवर्तन सुरू आहे.
Breaking News: heavy rain everywhere in the district, orange alert today