सैन्य दलाचा दारुगोळा चक्क नागरिकाच्या घरात; काय आहे प्रकरण? – Ahmednagar
Ahmednagar News: एका व्यक्तीच्या घरासमोरील पत्र्याच्या पडवीमध्ये भारतीय सैन्य दलात वापरल्या जाणाऱ्या दारूगोळ्यांच्या साहित्याचा मोठा साठा सापडल्याने खळबळ, आर्मी इंटेलिजन्स ब्युरो’ व ‘एटीएस’च्या टीमसह घरी छापा (Raid) टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात जिवंत, मृत बाँब आढळले.
अहमदनगर: नगर तालुक्यातील खारेकर्जुने शिवारात एका व्यक्तीच्या घरासमोरील पत्र्याच्या पडवीमध्ये भारतीय सैन्य दलात वापरल्या जाणाऱ्या दारूगोळ्यांच्या साहित्याचा मोठा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये सुमारे 50 जीवंत आणि मृत बाॅम्ब, तोफ गोळ्यासाठी वापरली जाणारी 25 किलो टीएनटी पावडर मिळून आली आहे. शुक्रवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), एमआयडीसी पोलीस, दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) व आर्मी इंटेलिजन्स ब्युरो यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
दिनकर त्रिंबक शेळके याच्या घरामध्ये सैन्य दलात वापरल्या जाणाऱ्या साहित्यांचा साठा असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार, आर्मी इंटेलिजन्स ब्युरो व एटीएस पथकाला सोबत घेत शुक्रवारी सायंकाळी शेळके याच्या घरी छापा टाकला. त्या ठिकाणी घरासमोरील पडवी आणि भिंती लगत जीवंत आणि मृत बाॅम्ब, पावडर मिळून आली. सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेत जप्त केले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा शेळके याच्याकडे कुठून आला आणि तो याचा उपयोग कुठे करणार होता याबाबतची माहिती पोलिसांसह आर्मी इंटेलिजन्स ब्युरो घेत आहे.
Web Title: Found a large cache of ammunition materials ATS Raid
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App