शिर्डीत साई मंदिरलगत पार्किंगमध्ये गोळीबार
Breaking News | Ahmednagar Firing: साईलक्ष्मी पार्किंगमध्ये भरदिवसा दोन तरुणांनी गोळीबार केल्याने शहरात खळबळ उडाली.
शिर्डी: गुरुवारी सकाळी साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साईलक्ष्मी पार्किंगमध्ये भरदिवसा दोन तरुणांनी गोळीबार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुण आपल्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून पार्किंगमध्ये आले आणि काही तरुणांसोबत त्यांचा जुन्या कारणातून वाद झाला. वादावादीत त्या दोघांनी लाकडी दांडा आणि पिस्तूल उगारून हवेत गोळीबार केला आणि पळ काढला. पार्किंग शेजारी असलेल्या हॉटेल गुरुस्थान समोरही त्यांनी एक गोळी हवेत झाडली, मात्र ती एका हॉटेलच्या काचेला भेटून गेली. गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी गर्दी जमा झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या पथकाने घटनास्थळी येत गर्दी पांगविली. पोलिसांना घटनास्थळी पिस्तुलातील काडतूस आणि रिकाम्या पुंगळ्या, लाकडी दांडा आणि स्प्लेंडर मोटारसायकल मिळाली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक चौकशी करत आहेत. या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतल्याने नागरिकांमध्ये दिलासा मिळाला आहे.
Web Title: Firing in parking lot next to Sai temple in Shirdi
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study