मुलीची दिवाळी गोड करून बापाने केली आत्महत्या
Breaking News | Suicide Case: मुलीच्या घरी जाऊन तिला दिवाळी भेट दिल्यानंतर गावी परतणाऱ्या बापाने रस्त्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
बाजार सावंगी : मुलीच्या घरी जाऊन तिला दिवाळी भेट दिल्यानंतर गावी परतणाऱ्या बापाने रस्त्यातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही दुर्दैवी घटना खुलताबाद तालुक्यातील धामणी शिवारात सोमवारी (ता. ४) रात्री उघडकीस आली.
साहेबराव पांडुरंग सोनवणे (वय ५५, रा. शेखपूर वाडी, ता. खुलताबाद) असे मृताचे नाव आहे. शेखपूरवाडी येथील साहेबराव सोनवणे हे चिकलठाण (ता. कन्नड) येथे मुलीला दिवाळीची भेट देऊन सोमवारी जेवण करून सायंकाळी रस्त्याने गावी शेखपूर येथे पायी निघाले होते. दरम्यान, त्यांनी गंधेश्वर व बोडखा गावच्या धामणी शिवारात पळसाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरातील लोकांना गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. गंधेश्वरचे पोलिस पाटील हाशम पटेल यांनी बाजार सावंगी पोलिस चौकीत माहिती दिली.
त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले आणि ग्रामस्थांच्या मदतीने साहेबराव यांना बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजुमन निलोफर यांनी त्यांना मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी साडेदहाला शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांकडे सोपविला. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली आहेत. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
Web Title: Father committed suicide by sweetening daughter’s Diwali
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study