Crime: संगमनेर तालुक्यात शेतातून चोरले ७० कॅरेट डाळिंब
Sangamner Crime News: जांबूत येथील प्रकार : ६० हजारांचा माल लंपास.
संगमनेर: ग्रामीण भागात घरफोड्या, दुचाकी चोरी, विद्युत पंप चोरी प्रकाराबरोबरच चोरट्यांनी आपला मोर्चा फळ पिकाकडे वळविल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील जांबूत बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंब बागेतून सुमारे साठ हजार रुपये किमतीचे ७० कॅरेट डाळिंब फळे चोरीस गेल्याची घटना घडली.
जांबूत बुद्रुक येथील शेतकरी कचरू भीमा डोखे (वय ५५) यांची गट नंबर २८/५ मध्ये डाळिंबाची बाग असून बागेत चांगल्या प्रकारची फळे आली आहेत. फळे विक्रीस आली असताना अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (दि. २९) सायंकाळी पाच ते शनिवारी (दि. ३०) सकाळी दहा वाजेच्या दरम्यान बागेत प्रवेश करून डाळिंबाचे सुमारे ७० कॅरेट चोरी केले. या अज्ञात चोरट्यानी सुमारे साठ हजार रुपयाचे डाळिंब चोरल्याचे कचरू डोखे यांनी सांगितले.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गणेश लोंढे हे करीत आहेत.
Web Title: Crime Filed 70 carat pomegranate stolen from farm in Sangamner taluka