अहिल्यानगर: दहा हजारांची लाच तलाठ्याविरोधात गुन्हा
Ahilyanagar Bribe case: खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी खताची सातबाऱ्यावर नोंद लावण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्याविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल.
अहिल्यानगर: खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी खताची सातबाऱ्यावर नोंद लावण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्याविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.
मुजीब अब्दुलरब शेख (वय ५१, रा. नवीपेठ, कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. हा प्रकार ३० नोव्हेंबर रोजी सजा हळगाव (ता. जामखेड) येथे घडला. तक्रारदार यांच्या वडिलांनी हाळगाव (ता. जामखेड) शिवारात गट नंबर १५५ मधील १ हेक्टर १० आर व गट नंबर १५४ मधील २ हेक्टर ३० आर क्षेत्र खरेदी केले होते. या खरेदी खताची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी ते तलाठ्याकडे गेले. तेव्हा तलाठ्याने लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाच न देता लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. त्याची दखल घेत अहिल्यानगर येथील पथकाने ३० नोव्हेंबर रोजी याबाबत पडताळणी केली. त्यात तलाठी शेख याने दहा हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जाखमेड पोलिस ठाणे गाठले. त्यानुसार तलाठ्याविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, चंद्रकांत काळे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, हारुण शेख आदींच्या पथकाने केली.
Web Title: Crime against Talathi for bribe of ten thousand
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study