मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणारे घरी बसलेत: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishan Vikhe Patil: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत महाविकास आघाडी राहील अशी स्थिती नाही.
शिर्डी: विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा खा. संजय राऊत यांनी केली आहे. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतंत्र लढो किंवा एकमेकांच्या डोक्यावर बसून लढो, त्याची आम्हाला काहीच चिंता नाही अशी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे.
शिर्डीत माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला जनतेनं नाकारलं. ते आता निवडणुका स्वतंत्र लढो किंवा एकमेकांच्या डोक्यावर बसून लढो, त्याची आम्हाला काहीच चिंता नाही. तसंच, राज्यात जो विजय आम्हाला विधानसभेला मिळाला तोच विजय आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. विखे पाटील म्हणाले, मी म्हणालो होतो, महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही. महाविकास आघाडीचे लोक भूमिका आणि तत्व यासाठी एकत्र आलेले नाहीत. महाविकास आघाडीची सत्तेत येण्याची धडपड होती. कोणी हिंदुत्व सोडलं, कोणी आपल्या विचारधारेला बाजूला ठेवले. सत्ता गेल्याबरोबर महाविकास आघाडीतील मतभेद समोर यायला सुरुवात झाले.
काँग्रेस उबाठाबद्दल बोलतंय, उबाठा राष्ट्रवादी बद्दल चर्चा करतय, असे म्हणत विखे पाटलांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तिन्ही पक्षांनी लालसापाई सत्ता स्थापन केली होती. निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करून त्यांनी विजय संपादन केला होता. मात्र ते नेरेटिव्ह विधानसभेला चाललं नाही. मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणारे घरी बसलेत, काँग्रेस पक्षाची दुरावस्था मी सांगण्याचं कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत महाविकास आघाडी राहील अशी स्थिती नाही असे विखे पाटील म्हणाले.
Web Title: CM dreamers sit at home Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News