आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने वेटरवर रोखली पिस्तूल
Nashik Road Crime: नाशिक रोड रेल्वेस्थानकातील हॉटेलमध्ये त्यांनी वेटरवर सर्व्हिस रिव्हॉल्व्हर रोखल्याचा धक्कादायक प्रकार उघड.
नाशिकरोड : ग्रामीण पोलिस मुख्यालयातील अंमलदार विशाल झगडे (१३५६) हे आमदार सुहास कांदे यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्यावर असताना नाशिक रोड रेल्वेस्थानकातील हॉटेलमध्ये त्यांनी वेटरवर सर्व्हिस रिव्हॉल्व्हर रोखल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. झगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकाजवळील रामकृष्ण हॉटेलमध्ये झगडे हे जेवणासाठी गुरुवारी (दि.९) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गेले होते. फिर्यादी हॉटेल व्यवस्थापक सागर पाटील यांच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या सीरॉन शेख याने त्यांना ऑर्डर घेताना पोळी नसल्याचे सांगितले. त्यावरून झगडे व त्यांच्यासोबत असलेल्या दोघांनी वाद घालत, दमबाजी करत हातावर ‘पोलिस’ अक्षर गोंदविलेल्या संशयिने त्याच्या कंबरेला असलेली पिस्तूल काढून शेखवर रोखली. ‘मला रोटी पाहिजे, तू तिकडे काहीही कर’ असा दम भरत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पाटील यांनी ही बाब हॉटेलमालक विनोद भगत यांना सांगितली. यावेळी अन्य वेटर लोकांनीही पंधरा-वीस दिवसांपूर्वी याच व्यक्तीने किरकोळ कारणावरून हॉटेलमध्ये वाद घातला माहिती त्यांना दिली. वेटर होता, अशी यांनी बाहेर उभ्या नागरिकांकडून माहिती घेतली असता, बंदूक रोखणारा संशयित नाशिक पोलिस ग्रामीण मुख्यालयातील कर्मचारी व आ. सुहास कांदे यांचा अंगरक्षक विशाल झगडे असल्याचे समजले. पाटील व शेख यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नाशिक रोड पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ३५२,३५१ व शस्त्र अधिनियमांतर्गत झगडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली. झगडे यांची ही वर्तणुक पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी असून त्यांचे निलंबन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत सोमवारी (दि.१३) आदेश काढला जाऊ शकतो. सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जप्त वेटरवर झगडे यांनी रोखलेली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. तसेच झगडे यास अटक करून नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत त्यांना जामीन मंजुर केला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे.
Web Title: bodyguard of MLA Suhas Kande stopped the pistol on the waiter
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News