वाळू वाहतुकीस मदत करण्यासाठी लिपिक ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
Shevgaon News: तहसीलदार कार्यालयाच्या आवारात लाच (bribe) घेताना लिपिकाला पकडण्यात आले आहे.
शेवगाव: शेवगाव तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागातील एका लिपिकाला ५० हजार रुपयांची लाच स्विकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेने जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
हरेश्वर सानप असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. अवैध वाळू प्रकरणी दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच या पुढे वाळू वाहतुकीस मदत करण्यासाठी वाळू ठेकेदाराकडून 1 लाख रूपयांची मागणी केली होती. यातील 50 हजार रूपयांची लाचेची रक्कम घेताना शेवगावच्या तहसिल कार्यालय आवारातच नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून त्यास रंगेहाथ पकडले आहे. पुढील कारवाई सुरु असून सानप याने ही रक्कम कोनासाठी आणि किती घेतली याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहेत.
शेवगाव तहसील कार्यलयातील गौण खनिजचा कारभार पाहणारे कर्मचारी हप्ते देऊनही नाहक त्रास देत असल्याने वाळू व्यावसायत उतरलेल्या युवकांनी त्यांना पकडून देण्याचा निर्धार करून नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ठरल्यानुसार लाचेच्या रकमेपैकी 50 हजार रुपये स्वीकारताना तहसिलदार कार्यालयाच्या आवारात लिपिकाला पकडण्यात आले.
या कारवाईनंतर महसुल खात्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी नॉटरिचेबल झाले आहेत. तर हा लिपिक कोणत्या अधिकार्यासाठी ही लाच घेत होता. याचा शोध सुरू आहे. त्यातील अनेकांचे यंत्रणेशी अर्थपूर्ण संबंध आहेत. ही कारवाई नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या मागदर्शनाखाली उपअधिक्षक पाटील व त्यांच्या पथकाने केली.
Web Title: clerk was caught red-handed while accepting a bribe of 50,000