चीनची मुलगी झाली संगमनेरची सुन, महाराष्ट्रीयन पद्धतीने अनोखे लग्न संपन्न
Sangamner News: योगशिक्षक राहुल हांडे याची योगक्षेत्रातील कर्तबगारी पाहून आपल्या मुलीशी लग्न करण्याचे साकडे घालणाऱ्या चीनमधील दांपत्याच्या मागणीला मान देत राहुल हांडे हा चीनमधील मुलीशी विवाहबद्ध (Marriage).
संगमनेर: योग शिक्षण केंद्र चालवण्यासाठी चीनमध्ये गेलेल्या संगमनेर तालुक्यातील भोजदरी येथील रहिवासी योगशिक्षक राहुल हांडे याची योगक्षेत्रातील कर्तबगारी पाहून आपल्या मुलीशी लग्न करण्याचे साकडे घालणाऱ्या चीनमधील दांपत्याच्या मागणीला मान देत राहुल हांडे हा चीनमधील मुलीशी विवाहबद्ध झाले आहे.
योग शिक्षणातून ‘हिंदी – चिनी सगे सोयरे’ होण्याचा मान संगमनेर तालुक्याला मिळाला आहे. संगमनेर तालुक्यातील आशिया खंडातील सर्वात उंच आणि मोठे असलेले बाळेश्वरचे पठार हे प्रसिद्ध आहे. याच पठार भागातून भोजदरीच्या माध्यमिक विद्यालयातून शिकलेला विद्यार्थी राहुल याने योग क्षेत्रात भविष्यात काही संधी शोधण्यासाठी सन-२०११ साली प्रा.डॉ.राजेंद्र वामन यांच्या मार्गदर्शनानुसार संगमनेर महाविद्यालयात इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेतला. घरची परिस्थिती बेताची असल्याने राहणे-खाणे परवडणारे नव्हते. निसर्गोपचार केंद्रात राहण्याची सोय झाली व अण्णासाहेब वाडेकर यांच्या खानावळीत जेवणाची सोय झाली. खानावळीतील मिळेल ते काम करणे. अगदी वेळेला स्वयंपाक, भाजी, भांडी घासण्यापासूनचे काम केले. केवळ जिद्द चिकाटीच्या जोरावर व दैनंदिन योगाचे धडे गिरवत पुणे विद्यापीठाच्या योग संघात राष्ट्रीय पातळीवर राहुलची निवड झाली. दीड वर्ष कालावधीचे योग निसर्गोपचार डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करत इंग्रजी व योगाची शिक्षणातून पदवी पूर्ण केली. पदवीनंतर कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ, नागपूर यांची एम.ए.योग पदवुत्तर पदवी मिळवली. योग शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रा.डॉ.राजेंद्र वामन व माजी विद्यार्थी देवा उर्फ म्हाळू शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाने चीन येथे योगशिक्षक म्हणून राहुल कार्यरत आहे. तेथे जाऊन इतरांच्या हाताखाली किती दिवस काम करणार म्हणून स्वतःचे योग केंद्र मकाऊ, चायना या देशात सुरू केले. राहुल हांडे याची कर्तबगारी पाहून चीनमधील योंग छांग व त्यांची पत्नी मेई लियान या जोडप्याने आपली कन्या शान हिच्यासाठी राहुल कडे मागणी घातली. राहुल व त्यांची आई, वडील, भाऊ, बहीण सर्वांनी अखेर प्रा.डॉ.राजेंद्र वामन यांच्या मार्गदर्शनानुसार होकार दिला. ज्या पठार भागात नदीकाठचे माणसे आजही दुष्काळामुळे मुली द्यायला का-कू करतात. अशा दुष्काळी पठार भागातील मुलाला केवळ कर्तव्य आणि योग क्षेत्रातील कलागुण या जोरावर आज आंतरराष्ट्रीय व्यक्तीने लग्नासाठी मागणी घालावी ही अति आनंदाची व अभिमानाची बाब आहे. या दोघांचा हळदी समारंभ रविवार २ जुलै २०२३ रोजी पार पडला व लग्न समारंभ सोमवार ३ जुलै २३ रोजी घारगाव येथे पार पडला आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहणाऱ्या तसेच दुष्काळ कायमच पाचवीला पुजलेल्या भोजदरी या छोट्याशा गावातील २९ वर्षीय राहुल हांडे याने चक्क ३१ वर्षीय शान यान छांग या चीनी तरूनीशी चायनीज पध्दतीने कोर्ट मॅरेज केले. तीन ते चार दिवसांपूर्वी तिला भारत देशातील महाराष्ट्रात असणाऱ्या एका भोजदारी सारख्या एका डोंगर दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या छोट्याशा गावाची सून करून आणले. महाराष्ट्रीयन पद्धतीने दोन ते तीन दिवसांपासून या आंतरराष्ट्रीय विवाहाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत होती. अखेर लग्न घटीका जवळ आली. दोघांच्या हातावर मेहंदी रंगली आणि शान राहुलला हळद लागली. भटजीने शुभ मंगल सावधान झाल्यानंतर दोघांनी एकमेकाच्या गळ्यात वरमाला घातली. यानंतर राहुल याने लग्नाला आलेल्या सर्व नातेवाईकांशी शानची ओळख करून दिली. महाराष्ट्रीयन रूढी परंपरा तिला समजावुन सांगितल्या.
या आंतरराष्ट्रीय विवाह सोहळ्यास शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, आंबी दुमालाचे सरपंच जालिंदर गागरे, संगमनेर महाविद्यालयाच्या योग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र वामन अण्णासाहेब वाडेकर, एनएसयुआयचे अध्यक्ष गौरव डोंगरे, छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडू सातपुते यांच्यासह राहुल हडिचे नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कामेश टावरे यांनी शानशी चायनीज भाषेत संवाद साधला.
Web Title: China’s daughter became Sangamner’s daughter-in-law, a unique marriage
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App