अहमदनगर ब्रेकिंग: प्रेमसंबंधातून भाऊ व पतीने केला तरुणाचा खून
Ahmednagar News: प्रेमसंबंधातून एका युवकाचा खून केल्याची घटना, नेवासा पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल.
नेवासा: प्रेमसंबंधातून एका युवकाचा खून केल्याची घटना नेवासा तालुक्यातील खडका फाटा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिचा भाऊ व पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी महिलेच्या भावाने त्यास सहा महिन्यांपूर्वी मारहाण करुन पळवून नेले होते. याप्रकरणी महिलेच्या भावाविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
याप्रकरणी रामचंद्र किसन कोरडे यांनी (वय ५५, रा. पुरुषोत्तमपुरी, ता. माजलगाव, जि. बीड) नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीनुसार, माझा मुलगा रामेश्वर यास नवीन पीकअप गाडी घेऊन दिली होती. तिच्या बांधणीचे काम करायचे असल्याने मी व मुलगा रामेश्वर आम्ही नाशिक येथे गाडी नेली. गाडीचे काम न झाल्याने आम्ही दोघे नाशिक येथे मुक्कामी थांबलो व गाडीच्या कामासाठी पैसे कमी पडल्याने माझा मुलगा (दि. ३) पैसे आणण्यासाठी बीड येथे जाण्यासाठी दुचाकीवर गेला.
यादरम्यान मला त्याच दिवशी त्याचा दुपारी फोन आला की तो पैसे घेवुन निम्या वाटेत आला आहे. त्यानंतर मला दुपारी चार वाजेच्या सुमारास अविनाश सुरेश धिटे याचा फोन आला. त्याने सांगितले, की “आम्ही तुमच्या मुलास नेवासा येथे पकडले आहे. तो माझ्या बहिणीला भेटण्यासाठी आला होता, म्हणून आम्ही त्यास पकडुन ठेवले आहे. त्यास आम्ही इंदापूर येथे घेऊन जात आहोत. तुम्ही इंदापूर येथे या. ” असे तो म्हणाला. तेव्हा मी त्यास म्हणालो, की “तुम्ही त्यास एवढ्या लांब घेवुन जाऊ नका. मी एवढ्या लांब येऊ शकत नाही.” तेव्हा त्यांनी मला नेवासा येथे येण्यास सांगितले. तेव्हा मी दुचाकीवर निघालो. त्यानंतर मी पुन्हा फोन लावला असता, त्यास म्हणालो की, “तुम्ही माझ्या मुलास मारहाण करु नका. तेव्हा मला एका इसमाचा आवाज आला व तो मला म्हणाला की, मी विशाल बिरोटे आहे. तुमचा मुलगा माझ्या पत्नीस भेटायला आला होता. तेव्हा मला एका महिलेचा आवाज आला व ते त्यास मारहाण करत असल्याचे मला वाटले; परंतु ते मला म्हणाले की, आम्ही त्यास मारहाण केली नाही व त्यास आम्ही सोडुन देत आहोत.
औदुंबर हॉटेलच्या परिसरात तो बेशुद्धावस्थेत पडलेला होता. तेथील स्थानिक नागरिकांनी त्यास रुग्णालयात दाखल केले. नेवासा येथील खासगी रुग्णालयात मी जाऊन पाहिले असता त्याचेवर उपचार चालु होते व त्यास गंभीर मार लागलेला होता. त्यानंतर पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्याकडील दुचाकी व त्याने गावावरुन आणलेले दीड लाख रुपये आम्हाला मिळुन आला नाही. या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अविनाश सुरेश घटे (रा. इंदापूर, जि. पुणे), विशाल बिरोटे व आरोपी महिला (रा. वरखेड, ता. नेवासा) या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करीत आहेत.
Web Title: Brother and husband Murder young man due to love affair
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App