अहिल्यानगर: नियुक्ती आदेश देण्यासाठी घेतली 15 हजारांची लाच
Breaking News | Ahilyanagar: महावितरणमध्ये खासगी कंपनीमार्फत बाह्य स्त्रोत यंत्रचालक म्हणून नियुक्ती आदेश देण्यासाठी 15 हजारांची लाच (Bribe) घेतल्याप्रकरणी तिघांविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
अहिल्यानगर: महावितरणमध्ये खासगी कंपनीमार्फत बाह्य स्त्रोत यंत्रचालक म्हणून नियुक्ती आदेश देण्यासाठी 15 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तिघांविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. प्रदीप ऊर्फ विशाल विष्णू देवतरसे (वय 32, लिपिक जी. के. एंटरप्राइजेस, एमआर ट्रेड सेंटर, वाडिया पार्क, अहिल्यानगर, रा. राजेश्वर सोसायटी, मोहिनीनगर, केडगाव), विनोद बाबासाहेब दळवी (वय 28 लिपिक जी. के. एंटरप्राइजेस, एमआर ट्रेड सेंटर, वाडिया पार्क, अहिल्यानगर, रा. दळवी निवास, राम मंदिरामागे, भूषणनगर, केडगाव), अंबादास मनोहर कदम (प्रोप्रायटर जी. के. इंटरप्राईजेस, एमआर ट्रेड सेंटर, वाडिया पार्क, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. देवतरसे व दळवी यांना ताब्यात घेतले असून कदम हा पसार आहे.
तक्रारदार जुलै 2021 पासून खासगी कंपनी मार्फत बाह्य स्त्रोत यंत्रचालक म्हणून 33/11 के.व्ही. खडका उपकेंद्र, कक्ष प्रवरासंगम (ता. नेवासा) या ठिकाणी महावितरण कंपनी अंतर्गत कामकाज करत होते. 33/11 के.व्ही. खडका उपकेंद्र, कक्ष प्रवरासंगम या ठिकाणी कंपनीने 5 डिसेंबर 2024 पासून बाह्य स्त्रोत कर्मचारी भरण्याचे कॉन्ट्रॅक्ट जी. के. एंटरप्राइजेस, अहिल्यानगरचे प्रोप्रायटर अंबादास कदम यांना दिले होते. तक्रारदार बाह्य स्त्रोत यंत्र चालक म्हणून नियुक्तीचा आदेश घेण्याकरिता जी. के. एंटरप्राईजेस कार्यालय, अहिल्यानगर येथे गेले असता कार्यालयातील खासगी कर्मचारी प्रदीप उर्फ विशाल देवतरसे व विनोद दळवी हे तक्रारदार यांना भेटले.
त्यांनी तक्रारदार यांना नियुक्ती आदेश देण्याकरिता 11 महिन्याचे एकत्रित 15 हजार रूपये घेतल्याशिवाय नियुक्ती आदेश देऊ नका असे अंबादास कदम यांनी सांगितले असल्याचे कळविले. याबाबत तक्रारदार यांनी 13 डिसेंबर रोजी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आयोजित लाच मागणी पडताळणी दरम्यान देवतरसे व दळवी यांनी तक्रारदार यांच्याकडे कदम यांच्याकरीता 15 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत विभागाच्या पथकाने 17 डिसेंबर रोजी सापळा रचून 15 हजारांची लाच स्वीकारताना देवतरसे याला रंगेहाथ पकडले तर दळवी याला ताब्यात घेतले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष शिंदे, चंद्रकांत काळे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, हारून शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title: bribe of 15 thousand was taken to give the appointment order
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study