साई संस्थानच्या बेपत्ता कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला
Breaking News | Ahilyanagar Crime: तरुणाचा मृतदेह दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर कनकुरी परिसरात गोदावरी पाटात सापडला.
राहाता : साईबाबा संस्थानचा कर्मचारी सोमनाथ भीमराज डांगे (वय २३, रा. डोहाळे) या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर कनकुरी परिसरात गोदावरी पाटात सापडला. त्याच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅप कॉल डिलीट करण्यात आल्याने घातपात झाला की काय? असा संशय व्यक्त केला जात आहे.
शनिवारी (दि. २२) सोमनाथ हा सहा ते दोन अशी संस्थानमधील ड्युटी करून घरी परतला. साई संस्थान येथून आणलेले लाडू, हार त्याने शेजारच्या एका व्यक्तीला दिले. इतरांशी त्याचे बोलणे झाले. परंतु, तेथून तो घरी परतलाच नाही. नातेवाइकांनी शिर्डी पोलिस ठाण्यात सायंकाळी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान कनकुरी परिसरात पाटाच्या कडेला त्याचा मोबाइल व दुचाकी आढळली. राहाता व शिर्डी नगरपरिषदेच्या पथकाने पाटात शोधमोहीम सुरू केली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी सोमनाथचा मृतदेह सापडला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे करत आहेत.
Web Title: Body of missing Sai Sansthan employee found