हरिश्चंद्रगडाच्या दरीत आढळला एका तरूणाचा मृतदेह
Akole News: हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याच्या दरीत एका तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
अकोले : तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याच्या दरीत एका तरूणाचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ऋषिकेश बाळू जाधव (वय २१) असे या तरूणाचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेला ऋषिकेश जाधव हा नाशिक येथे शिक्षणानिमित्त राहत होता. सोमवारी (ता.१०) ऋषिकेशशी फोनवरून संपर्क न झाल्याने आईवडील नाशिकला आले. त्यानंतर त्यांनी त्यांचा तेथे शोध घेतला. तो मिळून न आल्याने त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत मंगळवारी (ता.११) तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता मित्रांनी तो मोटरसायकलवरून हरिश्चंद्रगडाकडे गेला असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांसह ऋषिकेशच्या नातेवाईकांनी गडाकडे ऋषिकेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे एक मोटरसायकल उभी असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी गडाचा परिसर व कोकणकडा परिसरात ऋषिकेशचा शोध घेतला असता कोकणकड्याच्या १६०० फूट खोल दरीमध्ये एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. त्यानंतर राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
Web Title: Body of a young man found in Harishchandragad valley