दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत राज्य मंडळाचा मोठा निर्णय
Breaking News | SSC, HSC Exam: सदर निर्णय राज्यस्तरावरून पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती अन्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमधून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा ११ ते १८ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. सुमारे ३१ लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर, कॉपी रोखण्यासाठी राज्य मंडळाने निर्देश दिले आहेत. सध्याच्या पद्धतीनुसार परीक्षा केंद्रावर त्याच शाळांतील शिक्षक केंद्र संचालक, पर्यवेक्षक किंवा परीक्षेशी संबंधित काम करतात. मात्र, आता यात बदल करण्यात आला आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की कॉपीमुक्त परीक्षांसाठी पुढील पाऊल टाकण्यात आले आहे. केंद्र संचालक, पर्यवेक्षक किंवा परीक्षेशी संबंधित कर्मचारी अन्य शाळांतून नियुक्त करण्याचा निर्णय राज्यस्तरावरून पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्हास्तरावर, स्थानिक पातळीवर काही बदल करण्यात आले होते. आता राज्यभरातच बदल लागू केला जाणार आहे.
Web Title: Big decision of state board regarding 10th, 12th exams
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News