Rain: भंडारदरात विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटात धो-धो पाऊस, गारांचाही सडा
भंडारदरा| Bhandardara: संपूर्ण नगर जिल्ह्यात सूर्य कोपला असतानाचा दुसर्या बाजूला भंडारदरा व परिसरात काल बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटात धो-धो पाऊस (rain) झाला. यावेळी गारांचाही सडा पडला होता. सायंकाळी 6 वाजेपर्यंत या पावसाची नोंद 47 मिमी झाली आहे.
उन्हाच्या झळांनी भंडारदरा परिसरातील ग्रामस्थ हैराण झाले होते. पण दुपारी 4 वाजेनंतर हवामान पालटले. अचानक आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. नंतर ढगांचा गडगडाट वाढला. विजाही चमकू लागल्या. काही वेळातच सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच पावसाने जोर पकडला. सोबत गारांचा सडाही पडू लागला.
परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाले नी ग्रामस्थांना उकाड्यातून दिलासा मिळाला. या पावसाची नोंद 47 मिमी झाली आहे. पाणलोटातही पाऊस असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. या वादळी वारे व पावसामुळे गहू पिकाला फटका बसला आहे. आंब्याच्या कैर्यांचाही सडा पडला होता.
Web Title: Bhandardara Lightning strikes, thunderstorms, rain