मोठी बातमी! बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा एकनाथ शिंदेना पाठींबा
Eknath Shinde: थेट ठाकरे घराण्यातच फुट पाडल्याचे दिसून येते. निहार ठाकरे यांचा शिंदे गटाला पाठींबा.
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलाच गट खरी शिवसेना असल्याचं सिद्ध करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांकडून निष्ठेची शपथपत्र घेत पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. आता तर थेट ठाकरे घराण्यातील सदस्यच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागला आहे.
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिला आहे. तसंच शिंदे यांच्या नेतृत्वात निहार ठाकरे आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे हे निहार ठाकरे यांचे सक्खे काका तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलत काका आहेत.
Web Title: Balasaheb Thackeray’s grandson Eknath Shinde support