अकोलेत महायुतीला धक्का, वैभव पिचडांसह या उमेदवारांचे अर्ज दाखल
Maharashtra Assembly Election 2024: महायुतीमध्ये फूट पडली असून युतीतील भाजपचे पिचड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अकोले: अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघात सोमवारी वैभव पिचड, मधुकर तळपाडे, मारुती मेंगाळ व भिवा घाणे यांनी उमेदवार अर्ज दाखल केले. भाजप नेते वैभव पिचड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातून डॉ. किरण लहामटे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित भांगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
शुक्रवारी (दि. २५) पिचड समर्थकांनी वैभव पिचड यांच्या अनुपस्थितीत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून सोमवारी पिचड यांनी पुन्हा स्वतः समर्थकांसह उपस्थित राहून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे मधुकर तळपाडे व मारुती मेंगाळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आघाडी आणि महायुतीमध्ये फूट पडली असून युतीतील भाजपचे पिचड यांनी, तर आघाडीतील सेनेचे तळपाडे व मेंगाळ यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत युती व आघाडीत झालेली बंडखोरी शमवण्यासाठी वरिष्ठांकडून कोणते प्रयत्न होतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. जय हिंद, जय भारत राष्ट्रीय पक्षाच्या वतीने भिवा घाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, आतापर्यंत आठ अर्ज दाखल झाले असून २३ जणांनी ३५ अर्ज नेले आहेत.
Web Title: Assembly Election candidates including Vaibhav Pichad was a shock to the Akolet Mahayuti
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study