Home नगर बंडखोर अर्ज भरायला बैलगाडीने गेला, पक्षाने विमान पाठवून मुंबईला बोलावलं

बंडखोर अर्ज भरायला बैलगाडीने गेला, पक्षाने विमान पाठवून मुंबईला बोलावलं

Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या उमेदवाराविरोधात भाजपच्याच नेत्यांनी बंडखोरी केलीय, तर काही ठिकाणी महायुतीतील मित्र पक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल.

Assembly Election bullock cart to fill the application, the party sent a plane and called him to Mumbai

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुती आणि महाविकास आघाडीलासुद्धा बंडखोरांचे आव्हान असून यामुळे दोन्हींची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झालीय. नाराज नेत्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. काही ठिकाणी भाजपच्या उमेदवाराविरोधात भाजपच्याच नेत्यांनी बंडखोरी केलीय, तर काही ठिकाणी महायुतीतील मित्र पक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केले आहेत. आता अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याआधी नाराजांची समजूत काढण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत.

शिर्डी मतदारसंघात भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात भाजपच्या नेत्यानं बंडखोरी केलीय. त्यांनी सहकुटुंब बैलगाडीतून जात अर्ज दाखल केला होता. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि चर्चेसाठी भाजपने थेट चार्टर्ड विमान पाठवून चर्चेसाठी मुंबईला बोलावलं आहे.

शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात भाजपच्या राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना बैलगाडीचा वापर केला.दरम्यान, पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आलीय. बंडखोर नेत्यांशी भाजप संपर्क साधत असून ४ नोव्हेंबरपर्यंत नाराजी दूर कऱण्याचा प्रयत्न असणार आहे.

भाजपने राजेंद्र पिपाडा यांची समजूत काढण्यासाठी त्यांना बुधवारी दुपारी विशेष विमान पाठवून मुंबईला बोलावून घेतलं. पिपाडा यांच्यासाठी शिर्डी विमानतळावर विशेष विमान दाखल झालं होतं. मुंबईत त्यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली. यावेळी पिपाडा यांनी पक्षातील आणि मतदारसंघातील अडचणी सांगितल्या. तसंच कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ असंही वरिष्ठ नेत्यांना सांगितलं. आता पिपाडा यांची मनधरणी करण्यात भाजप यशस्वी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Assembly Election bullock cart to fill the application, the party sent a plane and called him to Mumbai

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here