अकोलेत पावसाचे थैमान, दुकानामध्ये पाणी, दुकानदार उतरले रस्त्यावर
Akole Rain: रस्त्यावरील दुकानामध्ये, गाळ्यांत, पाणी घुसल्याने नागरिक संतप्त झाले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, रास्ता रोको आंदोलन.
अकोले: बुधवारी गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावत चांगलेच थैमान घातले. यामुळे अकोले शहरातील जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळाले. रस्त्यावरील दुकानामध्ये, गाळ्यांत, पाणी घुसल्याने नागरिक संतप्त झाले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संतप्त झालेल्या दुकानदारांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विरोधात रास्ता रोको आंदोलन केल्याने पोलीस व प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
अकोले शहर व परिसरात काल रात्री 7 वाजता सुरु झालेला पाऊस पहाटे चार वाजेपर्यंत सुरु होता. पावसाच्या या थैमानाने कारखाना चौक ते शम्प्रो पर्यंतच्या व्यवसायिक दुकाने व गाळ्यामध्ये पाणी घुसले. अचानक पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली. दुकानात पाणी घुसल्याने पाणी बाहेर काढण्यासाठी दुकानदार यानी प्रयत्न सुरु केले परंतू पाऊस थांबायच नाव घेत नव्हता तर दुसरीकडे पाणी प्रचंड वेगाने येत होते. तसतसे दुकानदाराच्या दुकानातील माल पाण्यात जात होता. काही दुकानदार माल दुसरीकडे नेतानाचे चित्र पहायला मिळाले. या दुकानदारांनी संपूर्ण रात्र जागुन काढली. काही ठिकाणी तर विद्युत पंप लावून पाणी काढण्याचे काम गुरूवारी रात्री पर्यंत चालु होते. विशेष करुन बेसमेंट मध्ये असणाऱ्या दुकानाचे जास्त नुकसान झाले. कारखाना चौक ते शम्प्रो पर्यंतच्या दोन्ही बाजुच्या दुकानाच्या समोर असणाऱ्या गटारी मध्ये हे पावसाचे पाणी बसत नव्हते. अलीकडेच अकोले शहरातुन जाणाऱ्या कोल्हार घोटी रस्त्याचे कौक्रीटीकरण झाले असून रस्त्याच्या कडेच्या गटारीची कामे चालु असून ती अत्यंत धिम्या गतीने सुरु असून ती रस्त्या पासुन उंच गेली आहेत. त्यामूळे पावसाचे सर्व पाणी आज दुकानात गेल्याचे दिसलें. आज झालेल्या पावसाने मेडिकल, रंग,हार्डवेअर, किराणा माल ,ब्यट्री, ऑटोमोबाइल, प्रेस,हॉटेल ,बेकरी, रेडीयम, प्लायवूड आदींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
संतप्त झालेल्या दुकानंदारानी आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास महात्मा फुले कारखाना चौक येथे अचानक रस्ता रोको सुरु केला. आज आठवडे बाजार असल्याने शहरात गर्दी असते. त्यामूळे वाहतुक जाम झाली. पोलिस तातडीने आंदोलन स्थळी दाखल झाले. परंतू आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिस व आंदोलकांची बाचा- बाची झाल्याचे चित्र दिसून आले. .दुकानदार यानी तातडीने गटारी फोडून द्या आणि पाणी काढून द्या. अनेक वेळा अकोले नगर पालिका प्रशासनाला सांगून ही तसेच सार्वजनीक बांधकाम विभागाला सांगुंन देखील दखल घेतली गेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात हा प्रश्न निर्माण होत असतो. यावर तातडीने उपाय योजना करावी व काय,स्वरूपी हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी करण्यात आली. आमचा प्रश्न सोडवा अन्यथा आम्ही हलणार नाही अशी भुमिका दुकानदार आंदोलकांनी घेतल्याने वातवरण तापले होते. एवढ्यात अकोले पोलिस ठाण्याचे सहा.पो.नी. मिथुन घुगे चौकात पोलिस फाटा घेउन दाखल झाले. त्यानी गाडीतून खाली उतरताच आंदोलकांना रस्त्यावरून हटविले.
आंदोलक याना चर्चा करण्याची विनंती केली. आंदोलक महालक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन सचिन शिंदे, वकील नवाज खतीब, रोट्रीचे माजी अध्यक्ष सचिन देशमुख , रफिक पठाण,जगन येलमामे,शगीर पठाण,इसुब पठाण, फ़िरोज खतीब ,नागेश कुलकर्णी,नगरसेवक नवनाथ शेटे ,आरिफ शेख , माजी नगरसेवक सचिन शेटे,मणसें चे तालुका अध्यक्ष दत्ता नवले ,शिव सेने चे नितीन नाईकवाडी यानी चर्चा केल्या वर घुगे यानी नगर पंचायती चे मुख्यधिकारी श्री .जगदाळे व सार्वजनीक बांधकाम चे अधिकारी श्री. शेळके याना तातडीने बोलाविण्यात आले. ते आल्यावर त्यांच्याशी चर्चा झाल्यावर तातडीने जेसीबी ने पाणी काढून देण्यास सुरवात झाली. यावेळी अकोलेच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांनी यावेळी भेट दिली.
Web Title: Akole rain, water in the shops